पुणे : मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघात ठार झालेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ केतन खुर्जेकर यांच्या मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी इहलोकाच्या प्रवासाला गेलेल्या त्यांच्या मित्राच्या आठवणीने त्यांचे डोळे वारंवार भरून येत होते.
याबाबतची माहिती अशी, डॉ. केतन खुर्जेकर व अन्य दोन डॉक्टर हे मुंबईहून परतत असताना तळेगावजवळ त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. गाडी कडेला घेऊन चालक टायर बदलत असताना त्याला मदत करण्यासाठी डॉ़ खुर्जेकर हे त्याच्या शेजारी उभे होते तर दोन डॉक्टर मागच्या बाजूला उभे होते. त्याचवेळी मुंबई बाजूकडून वेगाने वोल्वोने या चौघांना उडविले. त्यात गाडीचालक व डॉ. केतन हे जागीच ठार झाले. अन्य दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
डॉ केतन यांचे असे आकस्मिक जाणे इतके भयंकर आहे की अजूनही त्यांचे मित्र या धक्क्यातून सावरलेले नाहीत. ज्या दिवशी त्यांचा आयुष्य वाढण्याच्या शुभेच्छा द्यायच्या त्या दिवाशी त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ त्यांच्या मित्रांवर आली आहे. एक निष्णात डॉक्टरच नव्हे तर चांगला माणूस, मित्र गमावल्याची भावना अनेकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
नूमवि शाळेत त्यांच्यासोबत शिक्षण घेतल्या काही मित्रांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. यातील ऍड मंदार जोशी म्हणाले की, 'हा धक्का पचवणे आमच्यासाठीही खूप अवघड आहे. सदैव मदतीसाठी तयार असणारा एक हसरा आणि उमदा मित्र आम्ही गमावला आहे. योगेश अवधानी म्हणाले की, 'आम्ही जवळचा मित्र गमावला आहेच पण समाजाने त्याहून चांगला डॉक्टर गमावला याचे दुःख अधिक आहे. दिवसभरात कितीही शस्त्रक्रिया केल्या तरी रात्री तेवढ्याच उत्साहाने तो आम्हाला भेटायचा. शेवटचा रुग्ण तापसेपर्यंत त्याची बाह्यरूग्णसेवा कक्ष सुरु असायचा. माणूस म्हणून तो मोठा होताच पण वैद्यकीय पेशावर असलेल्या निष्ठेने तो अत्यंत सहृदयी डॉक्टर होता याचा आम्हाला वारंवार प्रत्यय आला आहे. माणसं जपणारा, कलाकार दिलाचा, पॅशनेट मित्र आम्ही गमावल्याची जखम कधीही न भरून येणारी आहे'.
जीवघेण्या अपघातांमधून जीवदान देणाऱ्याचा अपघाती मृत्यू
डॉ केतन हे मणक्याच्या शस्त्रक्रियेचे निष्णात तज्ज्ञ होते. त्यामुळे अपघातात मणक्याला दुखापत झालेल्या हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांनी त्यांना शब्दशः जीवदान दिले होते. परंतू त्यांचाच अपघाती मृत्यू होणे ही बाब चटका लावणारी असल्याचे त्यांच्या मित्रांनी बोलून दाखवले.
अभिनेता सुबोध भावे होता वर्गमित्र
अभिनेता सुबोध भावे हा त्यांचा वर्गमित्र होता. ही घटना समजल्यावर सुबोध यांनी त्यांचा फेसबुकवर उल्लेख केला असून त्यात त्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, 'काल माझ्या डॉक्टर असलेल्या मित्राचा रस्त्यावरच्या अपघातात जीव गेला.कारण तेच खड्डे,बेशिस्तपणा,निष्काळजीपणा आणि देशाच्या वाहतुकीचे नियम न पाळता जीव घेणारे छुपे दहशतवादी स्वतःवर आणि आपल्या घरच्यांवर प्रेम करत असाल तर गाडी चालवताना नियम पाळा,कारण कोणीतरी तुमची वाट पाहतंय'.