खेड शिवापूर/ वेळू : देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व आजी-माजी सैनिक यांचा वेळू ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी शहिदांच्या बलिदानाच्या आठवणींनी त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले होते.
आजी-माजी सैनिकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यात यावी, असा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. त्यासंदर्भात आपण शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भोर तालुक्याचे माजी उपसभापती अमोल पांगारे यांनी कार्यक्रमात दिली. वेळू ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने वेळू गावातील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा व आजी-माजी सैनिकांचा सन्मान कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय वेळू या ठिकाणी आयोजिण्यात आला होता. यावेळी माजी सभापती अमोल पांगारे, पंचयात समिती सदस्य पूनम पांगारे, सरपंच रेश्मा तांबोळी, उपसरपंच कविता पांगारे, उद्योजक राहुल पांगारे, माऊली वाडकर, माजी सैनिक मारुती वाडकर, हिरामण खुंते, अविनाश पांगारे, शहीद जवान नामदेव शिंदे यांचे कुटुंबीय, तसेच इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. देशाचे संरक्षण करणाºया सैनिकांच्या घरांसाठी कायमस्वरूपी घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यासाठी वरिष्ठ स्तरांवर चर्चा करून त्यासाठी निश्चितच पाठपुरावा केला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी महेशकुमार खाडे यांनी सांगितले.