पुणे : लोकनेते, स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा खरेपणा, त्यांची अफाट स्मरणशक्ती, दूरदृष्टी, राजकारणातील सुंस्कृतपणा, द्रष्टेपणा आणि शत्रूंनाही माफ करण्याची वृत्ती या वैविध्यपूर्ण गुणांमुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते. अशा शब्दांत वसंतदादा पाटील यांच्या राजकीय, सामाजिक आठवणींना उजाळा दिला.विजय तरुण मंडळ भवानी पेठ, स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील प्रेमी परिवाराच्या वतीने वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी, ज्येष्ठ सहकार नेते पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.डॉ. पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा हे अतिशय धाडसी मुख्यमंत्री होते. कोणत्याही कामात विनाकारण वेळ दवडणे त्यांना आवडत नसे. ते प्रत्येक काम झटक्यात पूर्ण करायचे.’’पवार म्हणाले, ‘‘वसंतदादांना बहुविध विषयांचे आकलन होते. त्यांचे शिक्षण भले ही कमी झाले होते; मात्र त्यांना उपजतच ग्रामीण शहाणपण लाभले होते. त्यांच्या कामाची पद्धत पाहता, राजकारणातही सुसंस्कृतपणा कसा असावा, याचे ते उदाहरण होते.’’ (प्रतिनिधी)
वसंतदादांच्या आठवणींना उजाळा
By admin | Published: March 02, 2016 1:16 AM