पुणे : पीएमपीएलने महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसचे नियम फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. फक्त महिलांसाठी असलेल्या या बसमध्ये महिलांसोबतच पुरुषही प्रवास करताना दिसतात. त्यामुळे तेजस्विनी बस ज्यांच्यासाठी सुरू केली होती त्यांनाच बसमध्ये जागा मिळत नसल्याने महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गर्दीच्या वेळी महिला विशेष बस सेवा सुरू करण्याची मागणीही महिला वर्गाकडून होत आहे.पीएमपीच्या एकूण प्रवाशांपैकी ३५ ते ४० टक्के प्रवासी या महिला आहेत. पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी सकाळी आणि संध्याकाळी कामाला जायच्या आणि सुटण्याच्या वेळी विशेष बस सेवा सुरू करण्याची मागणी नोकरदार महिला वर्गाकडून केली जात आहे.
पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी वाहकांमार्फत सर्व्हे केला होता. त्यात वाहकांनी देखील काही मार्गावर महिला विशेष बस सुरू करण्याची मागणी केली होती. पण पीएमपी प्रशासनाने यावर अजून तरी कोणतीही कार्यवाही केली नाही. प्रशासनाने महिलांचा सन्मान राखण्यासाठी तरी विशेष बस सेवा सुरू करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे. दरम्यान आमच्याकडे गाड्यांची संख्या वाढवण्यासंदर्भात सूचना आल्या आहेत, पीएमपीकडे गाड्यांची कमतरता असल्याने सध्या त्या लगेच वाढवणे शक्य नाही. तरी येत्या काही दिवसात महिला विशेष बस वाढवण्यात येतील असे पीएमपी प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
८ तारखेला देखील तिकीटच..
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या निमित्ताने पीएमपी प्रशासनाने तेजस्विनी बसची सुरूवात करताना दर महिन्याच्या ८ तारखेला महिलांना मोफत प्रवास अशी घोषणा केली होती. मात्र ८ तारखेला देखील वाहकाकडून तिकीट विक्री केली जाते, त्यामुळे हा निर्णय देखील कागदावरच असल्याचे स्पष्ट होते.
त्या ९० ई-बस सुरू करण्याची मागणी..
निगडी डेपोत दोन महिन्यांपासून उभ्या असलेल्या ९० ई-बसच्या लोकार्पण सोहळ्याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. २० ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण होणार होते. पण केंद्रीय मंत्र्यांना वेळ न मिळाल्याने हे लोकार्पण खोळंबले. एकीकडे पीएमपी प्रशासन बस कमी असल्याचे कारण देते तर दुसरीकडे ९० ई-बस उभ्या असल्याने, यात आमचा काय दोष असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे.