फुफ्फुस कर्करोग दिन : कोरोना झाल्यास वाढू शकते गुंतागुंत
पुणे : भारतात साधारणपणे १०० कॅन्सर रुग्णांमध्ये १०-१३ रुग्ण फुफ्फुसाच्या कॅन्सरने पीडित आहेत. भारतात दरवर्षी ७० हजारपेक्षा जास्त रुग्णाची नोंद होते, तर ६० हजारपेक्षा जास्त रुग्ण या रोगामुळे दगावतात. भारतीय पुरुषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरनंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरची संख्या जास्त आहे. हेच प्रमाण स्त्रियांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास ६२ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर २५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, अशी आकडेवारी उपलब्ध आहे.
दर वर्षी १ ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस
कर्करोग दिवस म्हणून पाळला जातो. कर्करोगाबाबत सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, हा यामागील उद्देश आहे. धुम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे धुम्रपानाचे प्रमाण जास्त असलेल्या देशांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाणही जास्त पहायला मिळते. श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, तीव्र खोकला, सूज येणे अशी लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येतात.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात म्हणाले, ''धूम्रपान, मद्यपान आणि प्रदूषण ही
फुफ्फुसाच्या कॅन्सरमागील महत्वाची कारणे आहेत. अमेरिकेत कॅन्सरच्या १०० रुग्णांपैकी ५५ जण, इटली, फ्रान्ससारख्या देशांमध्ये २५ रुग्ण, तर भारतात कॅन्सरच्या १०० रुग्णांपैकी १०-१२ रुग्ण फुफ्फुसाच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्करोगाचा संसर्ग एकाच फुफ्फुसात झाला असेल तर उपचारांनी बरा होऊ शकतो. मात्र, दोन्ही फुफ्फुसामध्ये कॅन्सर पसरला असेल तर धोका जास्त वाढतो. फुफ्फुसामध्ये कर्करोगाच्या उपचारांमध्ये रेडिओथेरपी दिली जात नाही. केमोथेरपीवर भर दिला जातो. मात्र, त्याची परिणामकारकता ५ टक्के इतकीच असते.''
------
साधारणपणे ४० वर्षे वयानंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान होते. फुफ्फुसाच्या कर्करोगाची दोन प्रकारे विभागणी करण्यात येते ‘स्मॉल सेल’ आणि ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसांचा कर्करोग. ‘नॉन-स्मॉल सेल’चे प्रमाण ९० टक्के तर ‘स्मॉल सेल’चे प्रमाण १० टक्के आहे.
हे दोन्ही कर्करोगाचे प्रकार वेगवेगळ्या उपचार पद्धतींमुळे वेगवेगळ्या मार्गांनी शरीरात पसरतात. आधुनिक संशोधनात त्यांचे अनेक उप-प्रकार दिसून आले आहेत. कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे उपचारपद्धत व्यक्तीपरत्वे बदलते. २०२५ पर्यंत फुफ्फुसाच्या कर्करोग भारतात सर्वाधिक असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या कर्करोगामध्ये तिसऱ्या स्टेजपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३०-४० टक्के इतके आहे. चौथ्या टप्प्यात मात्र गुंतागुंत वाढते. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोरोनाचा धोकाही वाढतो.
- डॉ. अनंतभूषण रानडे, माजी अध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडिअँट्रिक ऑनकॉलॉजी
-----
कोरोना विषाणू थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. कर्करोगाच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका वाढतो. रुग्णांच्या फुफ्फुसातील वायू पेशी डॅमेज झालेल्या असतात, फुफ्फुसाला दुखापत झालेली असते. त्यामुळे कोरोना झाल्यास रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते.
- डॉ. नानासाहेब थोरात