पिंपरी : स्वराज्याचा वारसा सांगणाऱ्या सिंहगडावर मर्दानी खेळ पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सिंहगडावरील पर्यटक निवासापासून याची सुरुवात होणार आहे. येत्या महिनाभरात हे रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत रुजू होत आहे.
टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर एमटीडीसीने पर्यटनसेवा सुरू केली आहे. पानशेत, कार्ला, माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वरमधील पर्यटक निवास सुरू झाले आहेत. पुणे विभागात अक्कलकोट आणि सिंहगड येथील निवासस्थान महिनाभरात पर्यटकांच्या सेवेत येत आहेत. एमटीडीसीच्या पर्यटनस्थळा नजीकच्या नैसर्गिक ठिकाणांची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली याची माहिती देण्यात येणार आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही कोरोनाची खबरदारी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती पर्यटकांना देण्यात येत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, तानाजी मालुसरे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तानाजी कड्याजवळ एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. त्याच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथे खुले ॲम्पी थिएटर आणि संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तेथे मर्दानी खेळ दाखविण्याचे नियोजन आहे. पर्यटकांना शिवकालीन युद्धकलांची अनुभूती या माध्यमातून घेता येईल. तसेच, कलाकारांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटायझर स्प्रे, ऑक्सिमीटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर पर्यटक निवासस्थानावर विवाहपूर्व छायाचित्र काढण्यास परवानगी देण्यात आली असून, वर्क फ्रॉम नेचर, कॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठकांसाठी रिसॉर्ट देण्यात येत आहेत.