बाणेर : बाणेर व बालेवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, नागरिकांना त्याचा ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.गणराज चौकातून धनकुडे वस्तीकडे जाणारा रस्ता, मिटकॉन कॉलेज रोड या महत्त्वाच्या रस्त्यांसह जवळपास प्रत्येक भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या कुत्र्यांचा रात्री समूहाने त्या-त्या भागात संचार असतो. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना भुंकणे, त्यांचा पाठलाग करणे, वेळप्रसंगी चावा घेण्याचे प्रकार घडतात. पायी जाणाऱ्या तसेच वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटेदुकटे फिरणेही अवघड होऊन बसले आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल १०-१२ कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत अथवा बसलेले असते. जवळून एखादी दुचाकी गेली, तर ही कुत्री अचानक या वाहनावर धाव घेतात. या कुत्र्यांनी अचानक केलेल्या धाव्यामुळे किंवा हल्ल्यामुळे वाहनचालक अतिशय घाबरून जातात व तोंडातून आवाज काढत आपले वाहन वेगात पळविण्याचा प्रयत्न करतात. यात तोल जाऊन ते जखमी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पालिका प्रशासनाने अप्रिय घटना घडण्यापूर्वी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बाणेर व बालेवाडी भागातील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
मोकाट कुत्र्यांनी मांडला उच्छाद
By admin | Published: April 26, 2017 4:03 AM