पुणे : कौटुंबिक हिंसेने पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचलेली असते, तिला न्याय मिळवून देत असतानाच महिलेला खंबीर करत तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात समुपदेशनाची गुणवत्ता वाढवणे' हा प्रकल्प मे २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत स्त्री अभ्यास केंद्र, आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे, यांच्या तर्फे आणि स्विस एड इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या आर्थिक सहाय्याने राबवला गेला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांतर्गत आलेल्या अनुभवांचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.स्त्रियांवर होणारी कौटुंबिक हिंसा हा केवळ भारतातील नव्हे तर जगातील एक गंभीर प्रश्न आहे. महिलेचे शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन व्हावे, मानसिक आरोग्यात सुधारणा व्हावी, निर्णय क्षमता वाढून पीडित स्त्रियांचे जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण व्हावे हा समुपदेशकांचा उद्देश असायला हवा. याच दृष्टीने अभ्यास करून तयार करण्यात आलेल्या 'प्रवास सक्षमतेकडे' या समुपदेशन मार्गदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.'प्रवास सक्षमतेकडे' या पुस्तकात समुपदेशन म्हणजे काय? त्याचे टप्पे, पीडित महिलेची मानसिकता समजणे ते न्याय मिळवून देणे, समुपदेशकाची भूमिका आदी सर्वंकष विचार मांडण्यात आला आहे. हे पुस्तक देशभरातील समुपदेशकांसाठी संदर्भग्रंथ होऊ शकेल असा विश्वास यावेळी विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, शामलाताई वनारसे, आयएलएस महाविद्यालयाच्या प्राचार्य वैजयंती जोशी, डॉ जया सागडे, प्रसन्ना इनवल्ली, डॉ शिरीषा साठे, मानसोपचारतज्ञ डॉ कौस्तुभ जोग आदी मान्यवर उपस्थित होते.
कौटुंबिक हिंसा पीडित महिलेच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करावे - विजया रहाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 4:30 PM