पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना उमेदवारांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा करणारे उमेदवार हे बऱ्याचदा अपयशामुळे खचून जातात. या परीक्षेसाठी स्पर्धा माेठी असते. त्यामुळे अपयश आल्यास त्याची मानसिक तयारी असावी असे मत केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम व देशात साेळाव्या आलेल्या तृप्ती धाेडमिसे - नवत्रे यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या संवादामध्ये तृप्ती बाेलत हाेत्या. यावेळी तृप्ती यांनी त्यांच्या स्पर्धा परिक्षेतील विविध टप्प्यांमधील अनुभव सांगितले. तसेच, स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी तृप्ती यांचा सत्कार करण्यात आला.
तृप्ती म्हणाल्या, शालेय शिक्षण मराठी माध्यमात झाले. बारावीनंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर अहमदनगर येथे खासगी कंपनीत निरीक्षकाचे काम केले. त्यानंतर 2012 मध्ये राज्यसेवेची परिक्षा दिली. पण, त्यात यश आले नाही. मात्र, 2013 साली राज्यसेवेची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सहायक राज्यविक्रीकर आयुक्त म्हणून रूजू झाले. यादरम्यान, राज्यसेवेची परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्रीय लोकसेवेच्या परिक्षेसाठी तयारी करण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने जिद्दीने प्रवास सुरू केला.
सहसा नोकरी सोडून पूर्णवेळ स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याची पद्धत अवलंबली जाते. मात्र, स्पर्धा परिक्षांची उमेदवाराकडून असलेली अपेक्षा, वेळ आणि पैसा यांचा विचार करून नोकरी करतच ही परिक्षा द्यायची असे ठरवले. त्यानंतर चार वेळा परिक्षा दिल्यानंतर हे यश संपादन झाले. यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असण्यासह, माहेरच्या व सासरच्या मंडळींनी दिलेला पाठिंबा, अपयशात दिलेली खंबीर साथ आणि माझ्या क्षमतांवर ठेवलेला विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. त्यासाठी वर्तमानपत्रांचे सतत असणारे वाचनदेखील महत्त्वाचे ठरल्याचे तृप्ती यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
केंद्रीय लोकसेवेच्या परिक्षेसाठी इंग्रजी सुधारण्यामध्ये वर्तमानपत्रांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. परिक्षेच्या तयारीसाठी कोणत्याही प्रकारचे खासगी क्लासेस लावले नव्हते. तसेच, अभ्यासदेखील घरात बसूनच केला. मात्र, स्पर्धेमध्ये आपली क्षमता पडताळण्यासाठी टेस्ट सिरीज लावल्या होत्या. अभ्यास करताना नोकरी, कुटुंब आणि वैवाहिक जीवन यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्यामुळे ही स्पर्धा अशक्य अशी वाटलीच नाही. खासगी नोकरी व शासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामांचा अनुभव हा मुख्य परिक्षेमध्ये पेपर लिहीताना महत्त्वाचा ठरल्याचेही तृप्ती यांनी सांगितले.
दाेन वर्षे समाजमाध्यामांचा केला नाही वापर
स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत असताना दोन वर्षे समाजमाध्यमांचा वापर केला नाही. तसेच, कौटुंबिक व नातेवाईक यांच्या समारंभांना कितपत वेळ द्यायचा हेदेखील समजणे गरजेचे आहे. परिक्षेमुळे सख्ख्या भावाच्या साखरपुड्यामध्येही सहभाग नव्हता. तर, लग्नावेळीही काही तासांसाठी मंडपात हजेरी लावल्याचे तृप्ती यांनी आवर्जून सांगितले.