पिंपरी : विक्रीसाठी नवी मुंबई येथून आणलेले मेफेड्राॅन आणि गांजा जप्त करून पोलिसांनी एकाला अटक केली. किवळे येथे गुरुवारी (दि. १४) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. मोसीन मोहमद खान (३८, रा. समतानगर, वळवण, लोणावळा, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह दीपक सूर्यवंशी उर्फ कोळ्या याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार विजय नलगे यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १५) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसीन खान याच्याकडे अमली पदार्थ असल्याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मोसीन खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५५ ग्रॅम मेफेड्राॅन (एमडी), ११०० ग्रॅम गांजा या अमली पदार्थांसह रोख रक्कम, तीन मोबाइल फोन चारचाकी वाहन, असा एकूण १२ लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मोसीन खान याने मेफेड्राॅन हा अमली पदार्थ वाशी, नवी मुंबई येथून दीपक सूर्यवंशी याच्याकडून आणला असल्याचे तपासातून समोर आले. त्यामुळे दीपक सूर्यवंशी याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक उद्धव खाडे तपास करीत आहेत.