पुणे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात आलेला तरुण गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविराेधी पथक दाेन च्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून १० लाख ७६ हजार रुपये किमतीचा ५३ ग्रॅम मेफेड्राॅन जप्त करण्यात आले आहे.
धीरज राजेश कांबळे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याच्याविराेधात बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे स्टेशन जवळ एक युवक मेफेड्राॅन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती अमली पदार्थ विराेधी पथकातील पाेलीस हवालदार प्रशांत बाेमदंडी यांना मिळाली हाेती. त्यानुसार पथकाचे पाेलिस निरीक्षक सुनील थाेपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संताेष देशपांडे, याेगेश मांढरे, संदीप जाधव, रवींद्र राेकडे, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझिम शेख, दिनेश बास्तेवाड यांच्या पथकाने सापळा लावला. तसेच पुणे स्टेशनच्या पार्सल गेटच्या बाहेर स्टेशनकडे जाणाऱ्या पुलाजवळून धीरज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५३ ग्रॅम आणि ८ मिलिग्रॅम मेफेड्राेन, इलेक्ट्रिक वजन काटा, दुचाकी, माेबाईल आणि राेख रक्कम असा एकूण साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.