पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री बारमध्ये झालेल्या बेकायदा पार्टीत मुंबईतून मेफेड्रोन आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोघांपैकी एकाला मुंबईतील गोरेगावमधून ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. दरम्यान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी दोघांना शनिवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई), करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एल थ्री बारमध्ये रविवारी मध्यरात्रीपर्यंत पार्टी सुरू होती. बारमधील प्रसाधनगृहात तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी एल थ्री बारच्या मालकासह आठ जणांना अटक केली. आरोपी नितीन ठोंबरे मूळचा मुंबईतील गोरेगावचा आहे. पार्टीच्या दिवशी तो मुंबईतून पुण्यात आला. त्याने मुंबईवरून येत असतानाच मेफेड्रोन (एमडी) आणले होते. त्यानंतर त्यांनी पार्टीत मेफेड्रोनचे सेवन केले. एल थ्री बारमध्ये येण्यापूर्वी ठोंबरे आणि त्याचा मित्र मिश्रा यांनी पार्टी केली होती. ठोंबरेकडून पाच ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. त्यानुसार दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील काही बार, रेस्टॉरंटमध्ये ‘डान्सफ्लोअर’चा परवाना नाही. तेथे मध्यरात्रीपर्यंत पार्टी सुरू असते. डान्सफ्लोअरचा परवाना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळतो. परवाना नसताना डान्सफ्लोअर सुरू ठेवणाऱ्या बार, रेस्टॉरंटची माहिती घेण्यात येत आहे. अशा रेस्टॉरंट, बारचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे.