पुणे : मुंबई येथून पुणे स्टेशन परिसरात मेफेड्राेन (एम.डी.) हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथक दाेनने अटक केली. त्याच्याकडून १० लाख २८ हजार ६०० रुपयांचे ५१ ग्रॅम मेफेड्राेन जप्त करण्यात आले आहे.
सोहेल युनूस खोपटकर (वय ४५ ,रा. हिंदरिया इस्टेट, नागपाडा, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविराेधात बंडगार्डन पाेलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे स्टेशन परिसरात एक व्यक्ती एम.डी. विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती साेमवार दि. २१ ऑगस्ट राेजी अमली पदार्थ विराेधी पथकातील पाेलिस अंमलदार सय्यद साहिल शेख व अझीम शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक, एस. डी. नरके, पोलिस अमलदार शिवाजी घुले, चेतन गायकवाड, महेश साळुंखे, संदीप शेळके, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेत साेहेल याला पकडले. तसेच त्याच्याकडून ५१ ग्रॅम ४३० मिलीग्रॅम एम.डी. आणि एक माेबाइल जप्त केला.