निमगाव केतकी : निमगाव केतकी (ता. इंदापूर) गावामध्ये परराज्यातील बहुसंख्य व्यापारी येऊन परिसरातील गावातील तालुक्यातील शेतमाल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सौदा करून विकत घेतात. या व्यापाऱ्यांकडून हा सर्व माल चढ्या भावाने विकत घेणारा मोठा व्यापारीच त्याचे पैसे घेऊन मागील आठवड्यात फरार झाला आहे़झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील फुलवडिया (तालुका राजमहल) गावातील समसुलभाई शेख (वय ५५) व्यापारी त्यांच्या राज्यासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातील ४२ व्यापाऱ्यांचे तब्बल एक कोटीहून अधिक रक्कम घेऊन गायब झाला. इंदापूर तालुक्यातील बहुतांशी गावात डाळिंबाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. या शेतकऱ्यांचा माल थेट बांधावर जाऊन बरेच लहानसहान व्यापारी दलाल मालाचा दर्जा बघून सौदा करून विकत घेतात. हा विकत घेतलेला माल हा समसुलनामक व्यापारी विकत घेत होता. या व्यापाऱ्याने मागील दोन वर्षांत बाजारामध्ये जम बसविला होता. त्यामुळे त्याच्यावर व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनीही विश्वास ठेवून व्यवहार केले होते़ मात्र, याचा फायदा घेत व्यापाऱ्याने सुमारे एक कोटी रुपयाला फसवून रातोरात मोबाईल बंद करून पोबारा केला़ याच व्यापाऱ्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील व्यापाऱ्यांचा व शेतकऱ्यांची अशीच किमान साठ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. सांगोल्यातील बरेच व्यापारी निमगावात येरझाऱ्या मारत आहेत. गावातील एका शेतकऱ्याला मालाचे दोन लाख रुपये दुपारी देतो, म्हणून गेला आहे तो अद्याप आलाच नाही, असे त्याने सांगितले. गावातील दुकानदार, मोठे कंपनीमालक तसेच डाळिंब पॅकिंगचे बॉक्स आदी साहित्य यांचेही काही लाखांत उधारी करून या व्यापाऱ्याने पळ काढला़ त्यामुळे मुक्तार मुलाणी यांनीही इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून तशा आशयाच्या तक्रारी अनेकांनी देण्यास सुरुवात केल्या आहेत. - आर्थिक फसवणुकीमुळे एरवी गजबजलेली डाळिंब व्यापारपेठ थंडावली आहे. काही शेतकऱ्यांनी मधले दलालांशिवाय डाळिंब विक्री केली़ असे शेतकरी तर कपाळाला हात लावून बसले आहेत. अशा शेतकऱ्यांची संख्याही जास्त असण्याची शक्यता आहे.याबाबत फसवणूक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी आम्ही कायदेशीर लढा उभारणार असल्याचे शेतकरी चळवळीचे अॅड. सचिन राऊत व अॅड. श्रीकांत करे यांनी सांगितले.
व्यापाऱ्याने घातला शेतकऱ्यांना गंडा
By admin | Published: April 22, 2017 3:36 AM