पुणे : शहरातील कोरोना परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात येत आहे. रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असतानाही सरकारने व्यवसायांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला नाही़. त्यामुळे झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२. १५ या वेळेत घंटानाद आंदोलन करणार आहेत.
दरम्यान यानंतरही राज्य सरकार जागे झाले नाही व दुकानांच्या वेळा वाढविलया नाहीत, तर बुधवार ४ ऑगस्टपासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया व आदी पदाधिकारी उपस्थित होते. रांका म्हणाले, दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील इतर सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही़. एकीकडे बाजारपेठा सोडून सर्व गोष्टी चालू आहेत, राजकीय सभा समारंभ, आमदारांच्या मुलांचे शाही विवाह होतात. परंतु, दुसरीकडे व्यापारी वर्गालाच लॉकडाऊनचे नियम लादले जात आहेत. यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष असून राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, वेळेत वाढ करण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणीही त्यांनी केली़
महापालिकेने व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले
पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यासह विकेंड लॉकडाऊनमधून शनिवार वगळण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले होते. मात्र, महापालिका आयुक्त यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम तूर्त जैसे थे राहतील, असा आदेश काल काढला आहे. महापालिकेचा हा प्रकार म्हणजे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचे यावेळी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले.
टास्क फोर्सची ही मस्तीच
दुकाने उघडी ठेवल्याने कोरोना पसरतो हा जावई शोध कुठल्या आधारावर टास्क फोर्सने लावला. हे अद्याप समजलेले नाही़ या टास्क फोर्सकडून मुंबईमध्ये एसी कार्यालयात बसून, पुणे शहराबाबत चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. टास्क फोर्सची ही केवळ मस्तीच असून, तिसऱ्या लाटेबाबत जनतेला व व्यापाऱ्यांना घाबरवण्याचे काम केले जात असल्याची टीका फत्तेचंद रांका यांनी यावेळी केली. दरम्यान व्यापारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुुंबियांना लसीकरणासंदर्भात सरकारने कुठलाच निर्णय वारंवार पाठपुरावा करूनही घेतला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरात महासंघाने सर्व सुविधा स्वखर्चाने उभारून देखील मुबलक लस पुरवठा होत नसल्याने या वर्गातील लसीकरण खोळबले असल्याचे त्यांनी सांगितले़