पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे दोन सक्षम बँकांचे विलीनीकरण होऊ शकते. या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणेच शारदा बँकेचे विलीनीकरण कॉसमॉस बँकेत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच या दोन्ही बँकांच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव एकमताने पारीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी त्यांचे सकारात्मक नोंदवले आहे, अशी माहिती शारदा बँकेचे कार्यकारी संचालक एस. एम. कामत यांनी दिली आहे.
प्रस्ताव तयार करताना श्री शारदा बँकेने सर्व सभासद, खातेदार, कर्जदार, ठेवीदार आणि सेवकांचे हित जपण्याची जास्तीत जास्त काळजी घेतली आहे. त्यामुळे येत्या २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या विषयावर ठराव ठेवण्यात येत आहे. अंतिम मान्यतेचा ठराव सभासदांनी बहुमताने मंजूर केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे कामत यांनी सांगितले.