पुणे : सह्याद्रीमधील जंगलांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मेस हा बांबू पाहायला मिळतो. परंतु, माणगा आणि मेस अशी वेगळी ओळख बांबूला नव्हती. त्यामुळे दोन्ही वेगळे असल्याचे मला निदर्शनास आले. त्यानुसार मी गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे निरीक्षण करत आहे. खरंतर यात माझे काहीच नाही. भोर, वेल्हा, मुळशी परिसरातील शेतकऱ्यांना हा बांबू चांगला माहिती आहे आणि ते त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे मी फक्त संशोधन केले आहे. सर्व श्रेय तर शेतकऱ्यांना आहे, अशा भावना वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. पी. तेतली यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे एक चांगले साधन म्हणून मेस बांबूची लागवड योग्य ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, मुळशी परिसरात मोठ्या प्रमाणावर सापडणाऱ्या मेस या नव्या बांबूच्या प्रजातीचा शोध डॉ. तेतली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच लावला आहे. परंतु, बांबूकडे अजूनही शेतकरी उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून पाहत नाहीत. त्यामुळे याविषयी डॉ. तेतली यांच्याशी संवाद साधला.
डॉ. तेतली म्हणाले,‘‘मेस हा बांबू अतिशय टिकाऊ असतो. ही ओळख प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना झाली. बांबूची शेती अतिशय चांगली असून, त्यापासून उत्पन्न मिळत आहे. आज शेकडो शेतकरी बांबूची लागवड करून पैसे मिळवत आहेत. मी भोर, वेल्हा, मुळशीत गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला. गटागटाने शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्त्व सांगितले. अगोदर पासून त्या परिसरात बांबूचे उत्पादन आहेच. पण अजून करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.’’
———————————
मेस बांबूपासून चांगले उत्पन्न
शेतकऱ्यांनी मेस बांबूची लागवड केल्यास त्याला चांगला भाव येतो. सध्या ६० ते १२० रुपयाला एक बांबू विकला जातो. हा दर शेतातही मिळतो. शेतकऱ्यांनी फक्त बांबूची लागवड करून वाढवायचा. तो कापणे आणि ट्रकमध्ये घेऊन जाण्याचे काम व्यापारी करतात. अशा प्रकारचे अनेक शेतकरी काम करत आहेत, असे डॉ. तेतली म्हणाले.
———————————-
सरकारकडून पानशेत आणि वेल्हा या ठिकाणी बांबूचे प्लांट उभे करण्यासाठी निधी दिला आहे. त्यातून येथे बांबूवर प्रक्रिया करून ते अधिक मजबूत करण्यात येतील. बांबूवर प्रक्रिया केल्यावर ते ३० ते ४० वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात.
- डॉ. पी. तेतली, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ
————————————-