प्रा. बाबेल यांच्या घरी मागील आठ वर्षापासून पर्यावरणपूरक गणपती घरी बसविला जातो. श्री गणपतीची चांदीची मूर्ती असून दरवर्षी मूर्ती घेतली जात नसल्याने मूर्तीचे मूल्य एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शालेय साहित्य खरेदी करण्यास दिले जाते.
यावर्षी ''असे सण,अशी परंपरा'' या संकल्पने अंतर्गत भारत वर्षातील दर महिन्यात साजरे होणाऱ्या सणांची थोडक्यात माहिती मांडण्याचा प्रयत्न प्रा.बाबेल यांनी केला आहे. गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती ,अक्षय तृतीया, वटपौर्णिमा, गुरुपौर्णिमा, दीप पूजन, १५ ऑगस्ट, नागपंचमी, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, घटस्थापना, दसरा, वसुबारस ,धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, तुलसीविवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, दत्त जयंती, गीता जयंती, मकर संक्रांत, महाशिवरात्र, रंगपंचमी होळी, यज्ञ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती घरगुती पर्यावरणपूरक गणपतीच्या माध्यमातून प्रा.बाबेल यांच्या घरी मांडण्यात आले आहे.
गेल्यावर्षी जुन्नर तालुका पर्यटन विकास संस्थेच्या मार्फत घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तयारीला सुरुवात केली असून माळा, फुले दुकानातील आणलेल्या कागदापासून तयार करण्यात येत आहे. लहान गट व खुल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. दररोज सायंकाळच्या आरतीसाठी समाजातील एका दाम्पत्याला बोलावून त्यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. त्यांना भेट म्हणून एक वैचारिक पुस्तक देण्यात येणार आहे.
"पर्यावरणपूरक गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी पर्यावरण संवर्धन संदेश देत आहे.आपले सर्व सण आणि उत्सव हे पर्यावरणाशी निगडित असून निसर्गाचा समतोल राखणारे आहेत. आपण केवळ सण साजरे करतो पण त्या सणांचा नैसर्गिक संबंध समजून घेत नाही.आपण आपले सण आणि उत्सव यांचा नैसर्गिक संबंध समजून घेतला तर आपल्या हातून आपले पर्यावरण नक्कीच समृद्ध होईल."
- प्रा.रतीलाल बाबेल
अध्यक्ष, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ