लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तुमचे अद्याप व्हेरिफिकेशन झालेले नाही, ते तातडीने करायचे आहे़ तुम्ही तत्काळ विचारलेली माहिती द्या, अन्यथा तुमचे सिमकार्ड २४ तासांत ब्लॉक होईल, असा तुम्हाला अचानक फोन किंवा मेसेज येऊ शकतो. हा फोन किंवा मेसेज म्हणजे तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याची सायबर चोरट्यांनी केलेली तयारी होय. त्यामुळे सावधान आणि अशा फोन, मेसेजकडे दुर्लक्ष करा.
सायबर चोरटे दररोज नवनवीन फंडे आणून लोकांना फसवित असल्याचे दिसून आले आहे. आधी लॉटरी लागल्याचे, परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे, नोकरीचे आमिष दाखविणारे फोन करून संबंधितांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार सायबर चोरटे करत असतात.
तुम्हाला कोणत्याही मोबाइल कंपनीकडून बोलतो, असे सांगणारा फोन अथवा मेसेज आला आणि त्याने तुमचे व्हेरिफिकेशन पेडिंग आहे, असे सांगून तुमचे सिमकार्ड ब्लॉक होईल, असा धाक दाखविला तर घाबरून जाऊ नका. फोन करणाऱ्याला किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका. त्याने पाठविलेली कोणतीही लिंक अथवा अॅप डाऊनलोड करू नका. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही.
तब्बल १५ हजार तक्रारी
सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या कारणावरून फसविल्याच्या तब्बल १४ हजार ९५० तक्रारी गेल्या वर्षी २०२० मध्ये सायबर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. या वर्षी ३१ मेपर्यंत पाच महिन्यात तब्बल ७ हजार २० तक्रारी आल्या आहेत. त्यात सिमकार्ड ब्लॉक होईल, असे सांगून फसवणूक झाल्याच्या ११ तक्रारी आहेत.
कोणतीही बँक अथवा मोबाईल कंपनीतील अधिकारी, कर्मचारी कधीही फोन करत नाही. कंपनीकडून असे अॅप डाऊनलोड करण्याविषयी सांगितले जात नाही. हे कायम लक्षात ठेवा. छोटीशी सतर्कता बाळगली तर आपण सायबर चोरट्यांना दूर ठेवू शकतो.
सुरक्षा आपल्या हातात
ज्याप्रमाणे मोबाईल आपल्या हातात असतो. त्याचप्रमाणे सायबर चोरट्यांपासून आपली सुरक्षा करणे हेही आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्तीला आपली व्यक्तिगत माहिती देऊ नका. कोणतीही लिंक डाऊनलोड करण्यापूर्वी आपण फसविले जाणार नाही ना, याची खात्री करा.
दगडू हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.
.........