पुणे : नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांतील तरुणाईने मानवी साखळीतून ‘युथ अगेन्स्ट अॅडिक्शन’चा संदेश दिला. ‘दारू नको, दूध प्या’ असे म्हणत केलेले प्रबोधन, स्वाक्षरी मोहिमेतील लक्षणीय सहभाग आणि पथनाट्यातून जनजागृती करीत तरुणाईने सरत्या वर्षाला निरोप दिला. डेक्कनजवळील गुडलक चौकात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व शिवाजीनगर नागरी कृती समितीतर्फे मानवी साखळी व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, अनिरुद्ध हाळंदे, अजित जोशी, संतोष राऊत, प्रदीप खरसे, राजन चांदेकर, विवेक कदम, चंद्रशेखर साळुंके, दत्तात्रय सोनार, राहुल आवटे, रवि लोहिया, डॉ. एम. आर. गायकवाड, प्रा. सारंग एडके, प्रा. सुशील गंगणे उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ५ वे वर्ष असून, मानवी साखळीमध्ये सहभागी झालेली तरुणाई व्यसनमुक्तीसोबतच ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण आणि पाणी वाचवासारखे सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती करत होती. श्रावणबाळ फाउंडेशनने उपक्रमात सहभाग घेतला.
‘युथ अगेन्स्ट अॅडिक्शन’चा संदेश
By admin | Published: January 02, 2017 2:33 AM