पुणे : सोशल मीडियावरून झालेली ओळख एकाला चांगली महागात पडली. भारतात जमीन घ्यायची असल्याचे सांगत ऑनलाइन ९ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, मोबाइल नंबरसह बँक खातेधारकांविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्वेनगर येथील एका ४३ वर्षीय इसमाने दिलेल्या दिलेल्या फिर्यादीनुसार जुलै २०२३ मध्ये त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विल्सन रोज नामक महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती एक्सेप्ट केली. विल्सन नामक महिलेने ती अमेरिकेत रिअल इस्टेट व्यावसायिक असून, भारतात गुंतवणूकीच्या उद्देशाने जमीन घ्यायची असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर महिलेने त्यांना अमेरिका ते दिल्ली असे विमान तिकीट पाठवत, मी येत आहे असे सांगितले.
त्यानंतर विनय कुमार नामक व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करत दिल्ली विमानतळावरील कस्टम मधून बोलत असल्याचे सांगत, विल्सन रोज नामक महिला भारतात आली असून, तिच्याकडे ५ लाख पाऊंडचा चेक सोबत आहे. तिच्या बॅगेज क्लिअरन्ससाठी ७५ हजार ५०० रुपये भरण्याचे सांगितले, त्यानंतर दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान इन्शरन्स साठी म्हणून ३ लाख ७५ हजार रुपये भरण्याचे सांगितले, ५५ हजार रुपये हॉटेलचे बील व अन्य कस्टम ड्युटी वगैरे थापा मारत फिर्यादी यांच्याकडून ९ लाख ९४ हजार रुपये उकळले. त्यानंतर जेव्हा ५ लाख भरण्यासंदर्भात फिर्यादींना फोन आला, त्यावेळी त्यांना आपली आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.
यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली, तक्राराची शहानिशा करून पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शेडगे करत आहेत.