पुणे : संपूर्ण विदर्भातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून आणखी दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १७.९ अंश सेल्सिअस होते. सोमवारी ब्रम्हपूरी येथे कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. ते देशातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले होते.
विदर्भाच्या बर्याच भागात तसेच कोकण, गोव्याच्या तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. बुलढाणा येथे सरासरीपेक्षा तब्बल ५.४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानात वाढ झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६.५, लोहगाव ३७.९, जळगाव ४०.५, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४२, नाशिक ३५.८, सांगली ३६.९, सातारा ३७.३, सोलापूर ४०.२, मुंबई ३२.८, सांताक्रुझ ३२.६, अलिबाग ३४, रत्नागिरी ३२.८, पणजी ३४.३, डहाणु ३३.१, औरंगाबाद ३९.६, परभणी ४०.५, नांदेड ४०, अकोला ४१.७, अमरावती ४२.२, बुलढाणा ४१, ब्रम्हपूरी ४३, चंद्रपूर ४३.६, गोंदिया ४२, नागपूर ४१.९, वाशिम ४१, वर्धा ४२.२़