‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 01:12 PM2024-11-02T13:12:05+5:302024-11-02T13:12:39+5:30

भाजपने अवघ्या तासाभरातच बंडखोरी संपवली, काँग्रेसचे मात्र बंडखोरीकडे लक्षच नाही

Method of Thanda Hone Do BJP's insurgency is over in Pune Congress will continue, will the front be hit? | ‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

पुणे : भारतीय जनता पक्षाची विधानसभेसाठी पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघात होत असलेली बंडखोरी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने अवघ्या तासाभरात संपवली, काँग्रेसचा घोळ मात्र अजूनही सुरूच आहे. ‘ठंडा होने दो’ ही पक्षाची पारंपरिक पद्धत अवलंबण्यात येत असून, ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच चित्र स्पष्ट होईल.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) असे प्रमुख ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यातील जागा वाटप निश्चित होत नव्हते, त्यामुळेच अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली होती. त्यातही भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून जास्त जण इच्छुक होते. जागावाटप निश्चित झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी उचल खाल्ली व बंडखोरी जाहीर केली.

भाजपमध्ये कोथरूडमधून अमोल बालवडकर, उज्ज्वल केसकर, पर्वतीमधून श्रीनाथ भिमाले, शिवाजीनगमधून मधुकर मुसळे, कॅन्टोन्मेटमधून भरत वैरागे अशा अनेकांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतरही लढणार असे जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य वरिष्ठ नेत्यांनी भिमाले, बालवडकर यांच्याबरोबर संपर्क साधला. त्यांनी लगेचच माघार घेत असल्याचे जाहीर केले. केसकर यांच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संभाषण केले व त्यांनीही माघार घेत असल्याचे सांगितले. आता मुसळे व वैरागे यांच्यापैकी वैरागे यांनी अर्ज दाखल केला आहे, मात्र हा अर्जही मागे घेतला जाईल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

अवघ्या एका तासात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी शमवली. दुसरीकडे काँग्रेस मात्र बंडखोरी होऊनही तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसबा विधानसभेतून पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघात पक्षाचे पदाधिकारी मुख्तार शेख यांनीही बंडखोरी केली आहे. पर्वतीत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज सादर केला आहे. शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर अर्ज सादर करून आव्हान उभे केले आहे. तीन ठिकाणी अशी बंडखोरी होऊनही पक्षाचे स्थानिक, वरिष्ठ पदाधिकारीही शांतच आहेत. बंडखोरांबरोबर बोलणे, त्यांना समजावणे यापैकी काहीही झालेले नाही. ठंडा होने दो, ही काँग्रेसची दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची खास पद्धत आहे. तीच पुण्यातही अवलंबण्यात येत आहे, अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून होत आहे.

निवडणूक आहे, प्रत्येकाला ती लढवण्याची इच्छा असतेच. ज्यांनी पक्षाच्या मान्यतेशिवाय अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. तेही पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांबरोबर बोलतील. त्यानंतर ते अर्ज मागे घेतील याची खात्री आहे. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस 

Web Title: Method of Thanda Hone Do BJP's insurgency is over in Pune Congress will continue, will the front be hit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.