पुणे : हाॅलिवूडमधून सुरु झालेली मी टू ही चळवळ जगभरात पसरत अाहे. भारतातही या चळवळीमुळे अनेक महिला पुढे येऊन अापल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत अाहेत. या चळवळीतून स्त्रीयांना एक प्लॅटफाॅम मिळत असून त्यांच्यात हिम्मत तयार हाेत अाहे. या मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली.
प्रसादला वाटतं की साेशल मिडीयामुळे स्त्रीयांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बाेलता येत अाहे ही चांगली गाेष्ट अाहे. परंतु अत्याचार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी का अावाज उठवला जाताेय, त्यावेळीच का बाेललं गेलंं नाही. अत्याचार झाला त्यावेळीच स्त्रीयांनी पुढे येऊन बाेलयाला हवं हाेतं. मी टू चळवळ जरी चांगली असली तरी या मी टू बाबत अनेक विनाेद अाणि मेमे येण्यास सुरुवात झाली अाहे. त्यामुळे कदाचित या चळवळीचे गांभिर्य कमी हाेऊ शकते. स्त्रीयांनी ज्याक्षणी त्यांच्यावर अत्याचार हाेईल त्याच क्षणी अावाज उठवायला हवा, असं ताे म्हणताे.
या चळवळीमुळे स्त्रीयांना एकत्र येत अापल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल अावाज उठवता येताेय, ही खूप चांगली गाेष्ट असल्याचे सिद्धेश म्हणताे, अापल्या देशातील सामाजिक परिस्थीती पाहता महिलांवर अत्याचार झाले तरी त्या अनेकदा पुढे येत नाही. त्यांना ज्या व्यक्तीने अत्याचार केले त्याचा एकंदर राजकीय, सामाजिक दबाव पाहता अावाज उठवता येत नाही. त्यामुळे या चळवळीच्या माध्यमातून या महिला एकत्र येत अावाज उठवत अाहेत. अाराेपांबाबतची शहानिशा, कायदेशीर कारवाई हाेईलच परंतु महिला मनात न ठेवता पुढे येऊन बाेलत अाहे हे खूप महत्वाचे अाहे. कुठल्याही निर्णयापर्यंत येताना दाेन्ही बाजू मात्र तपासून पाहायला हव्यात.
अनुज म्हणताे, ही खूप चांगली चळवळ अाहे, अनेक महिला पुढे येऊन याबद्दल बाेलतायेत. परंतु या चळवळीचा काेणी गैरफायदा घेणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. ही चळवळ अशीच चालू राहायला हवी. तर साईनाथ म्हणाला, एखाद्या स्त्रीची अनुमती नसताना चुकीची गाेष्ट घडत असेल तर त्याकडे गांभिर्याने पाहायला हवे. ते प्रकरण तिथेच न राहता त्याप्रकरणाची शहानिशा करुन याेग्य ती कारवाई करायला हवी. एखाद्याचे समाजातील स्थानावरुन ताे असे काही करणार नाही, असा अंदाज बांधने गैर ठरेल. परंतु महिलांनी केवळ अाराेप न करता त्या प्रकणाच्या शेवटपर्यंत जायला हवे. तसेच त्या व्यक्तीकडून त्याच्या चुकीची कबुली घेणे अावश्यक अाहे. इतक्या वर्षांनी महिला का बाेलत अाहेत, हा प्रश्न निरर्थक अाहे. अनेकदा महिलांना ज्यावेळी अत्याचार हाेताे, त्यावेळी अावाज उठवता येत नाही याचा अर्थ त्यांनी नंतर अावाज उठवू नये असा हाेत नाही. या चळवळीमुळे चलता है हा समज जाण्यास मदत हाेत अाहे. तसेच महिलांना त्यांचा अावाज उठविण्यासाठी एक व्यासपीठ मिळत अाहे. परंतु दुसरी बाजू जाणून घेणेही तितकेच महत्वाचे अाहे.