पुणे : वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग या मेट्रोच्या नव्या मार्गांच्या सर्वंकष प्रकल्प आराखड्यास (डीपीआर) आणि भूसंपादनासाठी सात कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. या दोन्ही मार्गांचा एकूण खर्च तब्बल १२ हजार ६८३ कोटी रुपये आहे. या मेट्रो मार्गामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे आणि सिंहगड रस्ता हा भाग मेट्रोने जोडला जाईल.
राज्य सरकारच्या आदेशानुसार महामेट्रोने शहरातील नव्या मार्गाचे डीपीआर तयार करून महापालिकेला सादर केले आहेत. त्यानुसार वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासाठी महामेट्रोने वनाज ते चांदणी चौक असा १.२ किलोमीटर आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी असा ११.६३ किलोमीटर मेट्रो मार्गाचा डीपीआर महापालिकेला सादर केला होता. या कामासाठी ३ हजार ६०९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचसोबत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी हा २५.८६ किलोमीटर आणि पौड फाटा-वारजे-माणिकबाग हा ६.११ किलोमीटर असा एकूण ३१.९८ किलोमीटर लांबीचा नवा मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. यासाठी एकूण ९ हजार ७४.२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेला मिळाला दिलासा :
केंद्र व राज्याकडून प्रत्येकी २० टक्के रक्कम या प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. उर्वरित ६० टक्के रक्कम ही कर्जाच्या माध्यमातून उभी केली जाणार असून त्याची जबाबदारी महामेट्रोकडे असणार आहे. पालिकेला दोन्ही मार्गांच्या भूसंपादनासाठी सात कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. पूर्वी हा २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होता; पण केंद्र सरकारने मेट्रो कायद्यात केलेल्या बदलामुळे पालिकेला हा दिलासा मिळाला आहे.