पुणे : मान्यतेच्या शेवटच्या टप्प्यात असलेली पुणे मेट्रो आता भूमिगत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत तब्बल तीनपटींनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, हा निर्णय झाल्यास वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या सुमारे ३२ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी मेट्रोच्या सुधारित आराखड्याचा असलेला १० हजार ८६९ कोटींचा खर्च तब्बल ३५ हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी २००९ पासून महापालिकेकडून मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. हा आराखडा २०११ मध्ये केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आल्यानंतर, सलग तीन वर्षे पालिकेकडून मेट्रोसाठीच्या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू होते. हे काम मागील महिन्यात संपून आता फक्त सार्वजनिक गुंतवणूक मंडळ व कॅबिनेटच्या मान्यतेची औपचारिकता बाकी असतानाच, सोमवारी दिल्लीत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मेट्रोबाबत घेतलेल्या बैठकीत काही स्वयंसेवी संस्था तसेच खासदार अनिल शिरोळे यांनी भूमिगत मेट्रोबाबतही चर्चेचा आग्रह धरला. त्यानुसार, या बैठकीत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात प्रकल्पाचे सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
भुयारी मार्गाची मेट्रो तिपटीने खर्चिक
By admin | Published: December 04, 2014 4:56 AM