Pune: मेट्रो असताना परत टेकडीवर घाव कशासाठी? काँग्रेसचाही बालभारती-पौड रस्त्याला विरोध
By राजू इनामदार | Published: April 6, 2023 05:29 PM2023-04-06T17:29:01+5:302023-04-06T17:29:12+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे...
पुणे : कोथरूड व परिसरासाठी आता मेट्रो तयार होत असताना पुन्हा वाहतूकीचा प्रश्न उग्र झाल्याचे कारण देत वेताळ टेकडीवर घाव घालण्यामागे भारतीय जनता पक्षाचा मोठा डाव आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. बालभारती पौड रस्ता करण्याच्या आग्रहामागे राज्य सरकारमधील बडी हस्ती असून त्याच्या आग्रहापोटीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, या विषयात काँग्रेस निसर्ग प्रेमींबरोबर आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, कोंडी टळावी यासाठीच शहरात मेट्रोचे काम सुरू करण्यात आले. कोथरूड परिसरात मेट्रोचा डेपो आहे. वनाज ते गरवारे या मार्गावर मेट्रोची ५ स्थानके आहेत. कोथरूड भागातील नागरिकांना या स्थानकांमध्ये पोहचता यावे यासाठी कनेक्टीव्हिटी तयार करण्यात येत आहे. या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत महामेट्रोला खडसावण्याचे सोडून सत्ताधारी वाहतूक कोंडीचेच कारण देत आता वेताळ टेकडीचा घास घ्यायला निघाले आहेत. हे नियोजन व कल्पनाशुन्यतेचे उदाहरण आहे, मात्र तरीही ते केले जाते यामागे भाजपची बडी हस्तीच आहे.
वेताळ टेकडीवरील पर्यावरण, पक्ष्यांचा अधिवास यांना धक्का पोहचवणारा हा प्रस्तावित रस्ता झाला तर अशी कोणती वाहतूक कोंडी सूटणार आहे हे पालकमंत्ऱ्यांनी पुणेकर नागरिकांना जाहीरपणे समजावून सांगावे, त्यांची तर विरोधकांबरोबर साधी चर्चा करण्याचीही तयारी नाही अशी टीका जोशी यांनी केली. त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या रस्त्याच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत, पर्यावरणप्रेमी नागरिकांबरोबर चर्चा करत आहेत, बैठका घेत आहेत व त्याचवेळी पालकमंत्री पाटील मात्र रस्त्याच्या कामाची निविदा काढण्याची मागणी करत आहे हा काय प्रकार आहे असे जोशी म्हणाले. पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून वेताळ टेकडी वाचवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.