नम्रता फडणीस
पुणे : पुण्यात पहिल्यांदा मेट्रो धावली, त्याची वर्षपूर्ती येत्या सोमवारी (दि. ६) होत आहे. या वर्षभरात वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गावरील मेट्रोसेवेचा २० लाख प्रवाशांनी लाभ घेतल्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) केला आहे. परंतु, हा मार्ग पुणेकरांच्या तितकासा अत्यावश्यक सेवेत मोडत नसल्याने अनेक हौशी पुणेकरांनीच ‘फुलराणी’प्रमाणे मेट्रोत बसण्याचा आनंद लुटला. वर्ष होत आले तरी अद्याप गरवारे कॉलेज ते सिव्हिल कोर्ट आणि त्यापुढील मार्गांचा विस्तार होऊ शकलेला नाही. मेट्रो विस्ताराचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने पूर्ण विकसित मार्गांसाठी पुणेकरांना अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ रोजी वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या मेट्रो सेवेला येत्या सोमवारी (दि. ६) वर्ष पूर्ण होत आहे. पुण्यात पहिल्यांदाच मेट्रो धावली असल्याने मेट्रोच्या आकर्षणापोटी हौशी पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद साजरा केला. मेट्रोमध्ये वाढदिवस, कवितांची मैफल, पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रमही साजरे झाले. वर्षभरात जवळपास २० लाख प्रवाशांनी मेट्रोचा लाभ घेतला. त्यातून २.५९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. परंतु, आता मेट्रोची नवलाई संपली असून, प्रवाशांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. जोपर्यंत वनाज ते गरवारे कॉलेजचा विस्तार सिव्हिल कोर्टापर्यंत होणार नाही, तोपर्यंत प्रवाशांची संख्या कमीच राहणार आहे.
तीन मार्गांचे काम ३१ मार्चपर्यंत
मेट्रोच्या विस्तारात सिव्हिल कोर्ट, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज, शिवाजीनगर भाग समाविष्ट करण्यात येणार आहे. पिंपरी शहराला पुणे शहर मेट्रोद्वारे जोडले जाणार आहे. आरटीओ, पुणे स्टेशनही जोडले जात आहे. या मार्गांमुळे आगामी काळात प्रवासी संख्या नक्की वाढेल. आजमितीला रेंजहिल्स ते वनाज डेपोचे काम पूर्ण झाले आहे. गरवारे ते सिव्हिल कोर्ट व फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट तसेच सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल या मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या तिन्ही मार्गांचे काम हे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल. मार्चनंतर काही महिन्यांत या मार्गावर मेट्रोसेवा सुरू होईल. तसेच फेज १ चे काम जूनअखेर पूर्ण होईल. पण त्याचे लोकार्पण कधी करायचे, याचा निर्णय सरकार स्तरावर घेतला जाईल, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मेट्रो मार्गाच्या विस्ताराची कामे (फेज १)
* रेंजहिल्स ते वनाज डेपो काम पूर्ण* गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट (९५ टक्के काम पूर्ण)* सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल (९५ टक्के)*रुबी हॉल ते रामवाडी (९० टक्के) आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट (अंडरग्राऊंड काम ७० टक्के पूर्ण) मार्चनंतर तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण होईल.* पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज मार्गाच्या विस्तारासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल.* पुढील काळात मेट्रोचा विस्तार झाल्यानंतर तिकीट दर हे कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ५० रुपये असतील.
फेज २ चा डीपीआर महापालिकेला सादर
तीन महिन्यांपूर्वी फेज २ चा डीपीआर महापालिकेला सादर करण्यात आला आहे. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि एसएनडीटी ते वारजे आणि एफसीएमटीआर असे ८८.६ किलोमीटरचे पाच मार्ग डीपीआरमध्ये प्रस्तावित करण्यात आले आहेत. महापालिका हा प्रस्ताव राज्य सरकारकडे लवकरच मंजुरीसाठी पाठवेल अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.
गरवारे ते वनाज या मार्गावर मेट्रोच्या स्ट्रक्चरमध्ये काही त्रुटी
गरवारे ते वनाज या मार्गावर मेट्रोच्या स्ट्रक्चरमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सीओईपीला काम दिले आहे. त्यांनी चार ते पाच वेळा भेटी देऊन पाहणी केल्यावर एक अंतरिम पत्र दिले आहे. त्यात स्ट्रक्चर सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अजून काही तांत्रिक चाचण्या केल्यावर ते महामेट्रोला अंतिम अहवाल देणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.