पुणे: पुणे मेट्रो चा रेंगाळलेला प्रस्ताव दिल्ली येथे शुक्रवारी (दि.१४) सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत चर्चेसाठी घेतला जाणार आहे. प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. आयुक्त कुणाल कुमार बैठकीसाठी दिल्लीला गुरूवारीच रवाना झाले आहेत.राज्य व केंद्र सरकारच्या तांत्रिक विभागाची मान्यता मिळाल्यानंतर आता पुणे मेट्रो चा प्रस्ताव पीआयबी समोर येत आहे. या मंजुरीआधीच पुणे मेट्रो साठी साडेसहा हजार कोटी रूपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. पुण्याबरोबरच या मेट्रो मध्ये पिंपरी चिंचवड शहराचाही काही भाग येत असल्यामुळे तिथेही या प्रकल्पाबाबत बरीच उत्सुकता आहे. दोन्ही शहरे मिळून मेट्रो साठी पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करणार असून त्याची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मेट्रो चे सर्व कामकाज या कंपनीमार्फत चालणार असून कर्ज वगैरे आर्थिक बाबीही कंपनीच्याच नावे केल्या जाणार आहेत.पीआयबीची मंजूरी मिळाली तरीही केंद्रीय मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब या प्रकल्पावर होणे गरजेचे आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने मेट्रो च्या कामाला सुरूवात होईल. मेट्रो ची चर्चा सुरू झाली त्यावेळेपासून तिच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. रस्त्यावरून की भुयारी या वादात ती रखडली. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर विलंब झाला. दिल्लीतही हा प्रस्ताव बराच रखडला होता. आता पीआयबीच्या बैठकीत मंजूरी मिळाली की तिच्यासमोरचे अडथळे दूर होतील.
‘मेट्रो’च्या प्रस्तावास मंजूरी?
By admin | Published: October 14, 2016 4:58 AM