पुणे: मेट्रोच्या दोन्ही मार्गांमुळे बाधीत होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची तयारी महामेट्रो कंपनीने सुरू केली आहे. त्यासाठीचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात एकूण ६८८ जण बाधीत होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यातील बहुसंख्य बाधीत हे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गावरील आहेत.मेट्रोचे वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे दोन मार्ग आहेत. त्यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचा शिवाजीनगर ते स्वारगेट या सुमारे ५ किलोमीटर अंतराचा मार्ग भुयारी आहे. तो कृषी महाविद्यालयापासून सुरू होतो व तेथून सिव्हिल कोर्ट मार्गे कसबा पेठ, फडके हौद, दत्तमंदिर, मंडई, जुने श्रीनाथ चित्रपटगृह व पुढे स्वारगेट असा जाणार आहे. या भुयारी मार्गावर जमिनीत खाली ५ स्थानके आहेत. प्रवासी तिथे उतरले की त्याच जागेतून जमिनीवर येतील. ते जिथे वर येतील ती जागा महामेट्रोला हवी आहे. मेट्रो कायदा तसेच पुनर्वसन कायदा या हेतुने संबंधित जागांवरील सर्व बाधीत कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे व भूसंपादन अधिकारी प्रकाश कदम यांनी दिली. त्याशिवाय वनाजे ते रामवाडी या मार्गाचा काही भाग नदीपात्रातून जातो. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकापासून मेट्रो नदीपात्रात जाणार आहे. त्या नियोजित मार्गावर बरेच घरे तसेच दुकाने बाधीत होणार आहेत. या प्रकल्पात एकूण ६८८ कुटुंबे बाधीत होत आहेत. त्यात एकूण २४२ दुकाने आहेत तर उर्वरित घरे आहे. त्यातही पुन्हा काही झोपडपट्टीमधील घरांचा समावेश आहेत. या सर्व बांधितांबरोबर महामेट्रोच्या वतीने संवाद साधण्यात येत असून पुढील महिनाभरात त्यांच्या पुनर्वसनाविषयीच्या अपेक्षा जाणून घेत त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येईल जाईल असे कदम म्हणाले.बिऱ्हाडे म्हणाले, रस्त्यावरून जाणाऱ्या मेट्रोच्या कामाने आता गती घेतली आहे. रस्त्यांवरील स्थानकांचे कामही आता सुरू झाले आहे. एका स्थानकासाठी सुमारे १० खांब असतील व ते संपुर्ण स्थानक तोलून धरतील. नदीपात्रातील ५९ खांबांपैकी ३४ खांबांसाठी पाया खणून झाला आहे. त्यातील २५ खांबांचा पाया भरण्यात आला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या भागाचेही काम सुरू आहे. वनाजपासून पुढे कर्वे रस्त्यापर्यंतचे खांब टाकण्यात येत आहेत. नदीपात्रातील एका खांबाचे कॉक्रिट त्याला लावलेल्या सळयांच्या मधून बाहेर पडत होते. ही बाब खांब थोडा भरल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे त्यात टाकलेले काँक्रिट फोडून काढण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला देण्यात आले. ते काम शुक्रवारी सुरू होते असेही बिऱ्हाडे यांनी सांगितले.................
मेट्रोमार्ग बाधितांचे होणार पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 5:04 PM
मेट्रो कायदा तसेच पुनर्वसन कायदा या हेतुने संबंधित जागांवरील सर्व बाधीत कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देअॅक्शन प्लॅन करणार: ६८८ जणांचे होते आहे नुकसानया भुयारी मार्गावर जमिनीत खाली ५ स्थानके