पुणे - वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या आगाखान पॅलेस समोरच्या सव्वा किलोमीटर अंतराच्या मार्गाला हरकत आली आहे. मात्र, तो मार्ग तिथूनच जाणे फायद्याचे आहे. त्यासाठी दिल्लीत पुरातत्त्व खात्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुन्हा मागणी करू, वेळ पडल्यास या मार्गाचा तो भाग भुयारी करण्याचा पर्यायही वापरण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.मेट्रोच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बापट यांनी शुक्रवारी मेट्रो कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मेट्रोच्या कामाची माहिती दिली. काम वेगाने सुरू आहे. एकूण कामांपैकी २८ टक्के काम झाले आहे. अल्पावधीतच हा टप्पा गाठण्यात आला. पुणे शहराचा चेहरामोहरा मेट्रोमुळे बदलणार आहेच. शिवाय वाहतूक सुरळीत व प्रवाही राहण्यासही मदत होणार आहे, असे बापट यांनी सांगितले. मेट्रो मार्गाचे खांब, स्थानके, तसेच भुयारी मार्गाचे काम असे सर्व एकाच वेळी सुरू आहे. त्यामुळे त्याला गती मिळते आहे, येत्या दोन ते अडीच वर्षांत मेट्रो प्रत्यक्ष धावू लागेल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.आगाखान पॅलेसच्या विश्वस्तांनी पुरातत्त्व खात्याच्या कायद्याचा आधार घेत मेट्रोचा मार्ग स्मारकापासून नेण्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा मार्ग बदलून थोडा मागील बाजूने नेण्याचा महामेट्रोचा विचार आहे. मात्र, त्याची माहिती देताना बापट म्हणाले, तो मार्ग मेट्रोला प्रवासी मिळण्यासाठी फायदेशीर ठरणारा नाही. त्यामुळे आगाखान पॅलेससमोरचाच मार्ग चांगला आहे. त्यामुळेच दिल्लीत जाऊन या खात्याच्या विभागाकडे पुन्हा मागणी करणार आहोत. तरीही काही झाले नाही तर हा एवढा टप्पा भुयारी करण्याबाबतही विचार करण्यात येईल.स्वारगेट येथे मल्टी हब तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पीएमपी, एसटी व मेट्रो अशा तिन्ही प्रवासी सेवा एकाच ठिकाणी येणार आहेत. प्रवाशांना कसलाही त्रास होणार नाही. त्यांना कनेक्टिव्हिटी मिळेल. रिक्षा, सायकल यांची स्थानकेही तयार करण्यात येणार आहे.पादचाºयांची सुरक्षा हा विषय सर्वाधिक महत्त्वाचा ठरवून त्यांची काळजी घेण्यात आली आहे. वाहनांचा त्यांना कसलाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने सबवे तयार करण्यात आले आहेत. वाहनतळाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे बापट यांनी सांगितले.कसब्यातील बाधितांचा विरोध मावळलाशिवाजीनगर ते स्वारगेट या ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. त्याचे एक भुयारी स्थानक कसबा पेठेत येत आहे. या स्थानकातून वर येण्यासाठी म्हणून काही जागा लागते. त्यातून साधारण २४० कुटुंबे बाधीत होत आहेत. मात्र त्यांचे त्याच जागेवर पुनर्वसन केले जाईल.एकाही कुुटुंबाला बाहेर जावे लागणार नाही. त्यासाठी महापालिकेतून काही प्रशासकीय गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे होते. ती प्रक्रियाही आता मार्गी लागली आहे. त्यामुळे तेथील विरोध मावळला आहे, असे बापट यांनी सांगितले.
आगाखान पॅलेससमोरूनच मेट्रो मार्ग जाणे फायद्याचे - गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 2:09 AM