डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणार: महापालिकेच्या अर्थसंकल्पात घोषणा
पुणे : पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थ संकल्प सोमवारी ( दि. 1) सादर करण्यात आला आहे. यात शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करण्याबाबत ठोस पावले उचलली आहे. तसेच पुणेकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाविषयी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. शहरातील पाच टप्प्यांवर डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी जाहीर केले आहे.
कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.यावेळी शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
'मेट्रो' प्रकल्पाबाबत माहिती देताना रासने म्हणाले, पुढील ५० वर्षांचा वेध घेत पुणे शहराच्या चारही बाजूंना प्रत्येकी ५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका विस्तारित करण्यात येत आहेत. शिवसृष्टी ते रामवाडी, स्वारगेट ते निगडी, शिवाजीनगर ते हिंजवडी या तीन मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर मार्च महिन्यात मेट्रोची ट्रायल रन सुरू होणार आहे. या मार्गावर ऑगस्टपर्यंत मेट्रो धावू शकेल. तसेच या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणे अपेक्षित आहे. सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट, स्वारगेट ते कात्रज, शिवाजीनगर ते हडपसर, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, वारजे ते स्वारगेट अशा मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम नियोजित आहे.
स्वारगेट-कात्रज, नगर रस्ता बीआरटी कार्यान्वित
स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या ५.५० किलोमीटर लांबीच्या बी.आर.टी. मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
नगर रस्त्यावरील १६ किलोमीटर लांबीची बी.आर.टी. एस. योजना कार्यान्वित झाली आहे. पाटील इस्टेट जंक्शन ते हॅरिस ब्रिज, बोपोडी या ५.७० किलोमीटर रस्त्यापैकी पाटील इस्टेट ते रेंजहिल चौक या २ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
सिमला ऑफिस चौक ते राजीव गांधी पूल, औंध दरम्यान साडेसहा किलोमीटर लांबीचे प्रस्तावापैकी विद्यापीठ चौक ते औंध अशा ३.२ किलोमीटर लांबीचे रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
रेंजहिल चौक ते खडकी रेल्वे स्टेशन या २.२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम प्रस्तावित आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारितील जागेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू आहे.
गणेशखिंड रस्ता, पुणे-मुंबई रस्ता आणि पाटील इस्टेट ते संगमवाडी या मार्गावर १५ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित आहे.