पुणे : मेट्रोच्या उभारणीने शहरातील माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगाला (आयटी) गती मिळेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडूनदेखील मेट्रोचे काम लवकर व्हावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत होती. मेट्रो मर्गासह पूरक रस्ते, पादचारी मार्गांचे जाळे अशी सुसज्ज व्यवस्था असल्यास आयटी उद्योगासाठी ते फायदेशीरच ठरेल, अशी भूमिका आयटी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १८) मेट्रोच्या कामांचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर, आयटी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मत मांडले. हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य केदार परांजपे म्हणाले, ‘‘शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनांसाठी रस्ते कायमच अपुरे पडणार आहेत. आयटी क्षेत्रात वेतन चांगले असल्याने अनेकांचा कल चारचाकी घेण्याकडे असतो. त्यामुळेदेखील वाहतूककोंडीत भरच पडते. मेट्रो झाल्यास वाहतूक अधिक वेगवान होईल. त्यामुळे वैयक्तिक वाहन वापरण्याची गरज फारशी राहणार नाही. मेट्रोच्या नियोजनानुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे मेट्रो स्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी पूरक रस्ते, स्काय वॉक असेल. उलट सरकारने लवकरात लवकर हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, हे पाहिले पाहिजे. हिंजवडी येथील उद्योजकांच्या संघटनेकडूनदेखील मेट्रो प्रकल्प व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता.’’सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असोसिएशनचे सचिव विद्याधर पुरंदरे म्हणाले, ‘‘बंगळुरूपाठोपाठ आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील वाहतुकीची स्थिती फारशी चांगली नाही. प्रत्येक कर्मचाºयाला कार्यालयात येण्यासाठी सरासरी एक तास लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक अधिक वेगवान होईल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग हिंजवडी फेज-३ पर्यंत करावा, अशी मागणी येथील उद्योजकांनीच केली होती. आयटी उद्योजकांकडून मेट्रोचे स्वागतच करण्यात येत आहे. मेट्रोसाठी तयार करण्यात येणाºया पायाभूत सुविधांमुळे सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा होईल.हिंजवडीतील वाहतूककोंडीची समस्या४हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाºया सॉफ्टवेअर इंजिनिअरना वाहतूककोंडीच्या समस्येने अनेक वर्षे ग्रासलेले आहे. काही महिन्यांपूर्वी पीएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले, की शिवाजी चौक, हिंजवडी येथे दररोज १ लाख १५ हजार वाहनांची ये-जा होते. त्यातून सुमारे पाच लाख ११ हजार लोक प्रवास करतात. पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण १९ टक्के, तर हिंजवडी क्षेत्रामध्ये ते केवळ १० टक्के आहे. ९० टक्के खासगी वाहनांपैकी ५३ टक्के दुचाकी व ३६ टक्के चारचाकी आहेत. सकाळी १० ते ११ वाजता व सायंकाळी ७ ते रात्री ८ या धावपळीच्या वेळी वाकड चौकातून ताशी साडेदहा हजार गाड्या धावतात; त्यामुळे वाहतूककोंडी होऊन तरुण इंजिनिअरचा महत्त्वाचा वेळ नष्ट होतो. यामुळे २०१५मध्ये पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर हिंजवडी आयटी पार्कची वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले. ‘कनेक्टिव्हिटी’च्या अभावामुळे नुकसान होऊ नये, असे प्रत्येकाला वाटते. वेळ वाचला तर कुटुंबाला वेळ देता येईल. शेतमालासह उत्पादनांना बाजारपेठ वेळेत मिळावी, असे वाटत असते. सर्वसामान्यांना मुलांना शाळेला सहज जाता यावे, वाहतूककोंडीत अडकू नये, असे वाटते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांचा पायाभूत सुविधांवर भर आहे. त्यामुळे ‘नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरच्या एकत्रीकरणावर भर दिला आहे.