पुणे : वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावरच्या महापालिकेच्या नव्या इमारतीसमोरच्या स्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी बसथांबे हलवण्यास पीएमपीने मान्यता दिली आहे. रस्त्यापासून १४ ते १५ मीटर उंचीवर हे स्थानक असेल. नदीपात्रातून वृद्धेश्वर घाटाजवळून मेट्रोवर येऊन थेट या स्थानकावर थांबणार आहे.
पाऊस थांबल्याने मेट्रोच्या कामाने आता चांगली गती घेतली आहे. हे स्थानक १४० मीटर रुंद असेल. त्यावर वाहनतळासाठी जागा असणार आहे. फलाटावर मोठ्या एलईडी पडद्यावर आवश्यक ती सर्व माहिती सातत्याने प्रसारीत करणार आहे. त्याशिवाय स्थानकात वायफाय, कॅफेटेरिया अशा सुविधाही असतील. प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा असेल. महिलासांठी प्रसाधन गृहासह विशेष सुविधा असतील.तसेच या व मेट्रोच्या अन्य स्थानकांवरही नेत्रहीनांसाठी निर्मिती केलेल्या खास टाईल्स बसवणार आहेत. या टाईल्समुळे नेत्रहीनांना स्थानकात वावरताना अडचण येणार नाही.
वनाज ते रामवाडी या मार्गाचे मुख्य प्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ म्हणाले, दिव्यांगांनाही मेट्रोने सुलभतेने प्रवास करता यावा, यासाठी रॅम्पसह विशेष सुविधा स्थानकात असणार आहे.
रस्त्यापासून बरेच उंचावर असल्यामुळे या स्थानकाची रस्त्यावरच्या प्रवासी किंवा नागरिकांना काहीच अडचण होणार नाही. पावसाळा संपल्यामुळे आता नदीपात्रातील कामालाही चांगली गती आली आहे. महापालिकेपासून पुढे मेट्रो राजीव गांधी वसाहत, कामगार पुतळा या मार्गाने पुढे जाईल. त्या ठिकाणी दोन मोठ्या वसाहती आहेत.
साधारण ९० घरे बाधित होतील, असा अंदाज आहे. त्यांनी सर्वेक्षणाला मनाई केली होती. मात्र आता मान्यता दिली आहे. त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहेत.