पुणे : पुणे मेट्रो डिसेंबर २०१९ मध्ये धावणार असून, वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण ५ किलोमीटरचा मार्ग सुरू करण्यात येणार आहे. वनाज, आयडियल कॉलनी व गरवारे महाविद्यालय अशी तीन स्थानके या मार्गावर असतील. तिकीटदर पीएमपीच्या तिकीट दराएवढाच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ही वेळ गाठण्यासाठी मेट्रो प्रशासनाची धावपळ सुरू आहे.प्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ यांनी ही माहिती दिली. मेट्रोचे एकूण ४० टक्के काम पूर्ण होत आले आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे महाविद्यालय या ५ किलोमीटरच्या मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गावरील सर्व खांब तयार झाले आहेत. त्यावर कॅप्सही बसवून झाल्या आहेत. आता प्राधान्याने तीन स्थानकांची कामे सुरू करण्यात येतील. त्यापैकी आयडियल कॉलनीजवळ बीम टाकून झाले आहेत. पुढचे कामही गतीने सुरू आहे. स्थानक दोन स्तराचे असेल. वरचा स्तर फलाट (जिथून मेट्रोत प्रवाशांची चढउतार होईल) व त्याखाली प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा व तिथून खाली जमिनीवर अशी रचना असेल. १४० मीटर रुंदीचे प्रत्येक स्थानक असेल. प्रवाशांना वरखाली करण्यासाठी सरकते जिने, लिफ्ट अशी व्यवस्था असणार आहे.गाडगीळ म्हणाले, की तिकीटदरांबाबत पुणेकरांमध्ये साशंकता आहे. मात्र पीएमपीइतकेच दर असतील हे नक्की आहे. पहिल्या वर्षी दर ठरवण्याचे अधिकार महामेट्रोला असतील. मात्र त्यानंतर दर वाढवायचे असतील तर त्यासाठी एक स्वतंत्र समिती असते. त्या समितीकडे कंपनीला प्रस्ताव सादर करावा लागले. दरवाढीचे कारण द्यावे लागेल. तिथे त्यावर चर्चा होईल व त्यानंतर दर निश्चित होतील. हे दर पीएमपीसारखेच असतील, कारण त्यापेक्षा दर जास्त असेल तर त्याचा प्रवासीसंख्येवर परिणाम होतो. मात्र ही सर्व बाबत संबंधित समितीवर अवलंबून असते.>पुनर्वसनानंतरच टनेलचे कामशिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग तयार करणारी ४ यंत्रे साधारण आॅक्टोबर २०१९ मध्ये पुण्यात येतील. ती जोडण्यासाठी महिनाभर लागेल. नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशीभुयारी मार्गाचे काम सुरू होईल. या मार्गाला लागणाऱ्या सिमेंटच्या रिंग व अन्य साहित्य तयार करण्यासाठी महामेट्रो कंपनीने डेक्कन महाविद्यालयाकडून त्यांची जागा ३ वर्षांच्या भाडेकरारावर घेतली आहे. तिथे काम सुरूही करण्यात आले आहे. कसबा पेठ तसेच पुढे मंडई व स्वारगेट येथे जागा हस्तांतरित करण्यास विरोध होतो आहे. पुनर्वसनाबाबत काही जणांना शंका आहेत, त्या दूर केल्याशिवाय काम सुरू होणार नाही. त्याबाबत बोलणी सुरू आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हा मार्ग सुरू होईल, असे कामाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र त्याचा पुढील कामावर काही परिणाम होणार नाही. ते काम सुरू राहील. बहुतेक ठिकाणचे पिलर आता पूर्ण झाले आहेत. त्यावर कॅप्सही बसवून झाल्या आहेत. काही ठिकाणाचे काम अजून सुरू आहे; मात्र ते गतीने करण्यात येत आहेत. वाहतूक तसेच अन्य काही समस्यांची तीव्रता कमी करून नंतरच काम सुरू करण्यात येते.
मेट्रो डिसेंबरमध्ये धावणार, दर असणार पीएमपीइतकेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 1:10 AM