पुणे : पुण्यातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशी लोक या उत्सवासाठी खास पुण्यात येत असतात. यासह आगामी गणेशोत्सवाच्या नियोजन बैठकीचे सोमवारी शिवादीनगर पोलिस मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवादरम्यान मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत धावणार असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीवेळी त्यांनी मानाच्या गणपतींसह अन्य गणेश मंडळांना पोलिस व प्रशासनाने योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलिस आयुक्त रितेश कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, राजेश सिंग, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीस...
अजित पवार यांनी बोलताना राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सरकारने बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४४ उत्कृष्ट मंडळांना निवडून बक्षीस देण्यात येईल. यासाठी मंडळांनी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत असे सांगितले. विसर्जन मिरवणुकीसाठी फिरत्या हौदासाठी जुन्या कचरा पेट्या न वापरता स्वच्छ हौद वापरावेत. जनतेच्या भावनांचा अनादर होता कामा नये याची काळजी घेतली जावी. अनेक मंडळे दहीहंडी साजरी करतात. मागील काही दिवसांपासून हे प्रमाण वाढत आहे. सरकारने या खेळास साहसी खेळ म्हणून मान्यता दिली असून, विमा उतरवला जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पार्किंग व मिरवणुकीचे नियोजन २ दिवस आधी जाहीर करावे..
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी प्रशासनाला गणेश मंडळांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, गणेशोत्सवाविषयी मंडळांनी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सहकार्य करेल. कंट्रोल टॉवर ५ दिवस अगोदर सुरू करावा. पार्किंग व मिरवणुकीचे नियोजन २ दिवस आधी जाहीर करावे. वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी १ हजार वॉर्डन वाढवण्यात येत आहेत. काहीजण पुणे शहर अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंडळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
न्यायालयाच्या आदेशानुसार काम करणार..
पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कराव्या लागतात. त्यामुळे ध्वनीक्षेपकांविषयी कारवाई करावी लागते. ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक आवाज झाला तर कारवाई करणार. वाहतुकीबाबत मेट्रो आणि मनपा यांच्याशी चर्चा केली जाईल. शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू करण्यात येतील. वाहतुक नियमनासाठी अधिकचे मनुष्यबळ घेण्यात येत आहे. पुण्यात काही दहशतवादी मोड्यूल उघडकीस आले आहे, त्यामुळे त्यादृष्टिकोनातून सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाईल.
यंदा २३०० गणेश मंडळांना ५ वर्षांची परवानगी..
मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, यंदा २३०० गणेश मंडळांना ५ वर्षांची परवानगी देण्यात आली आहे. कमानीसाठी कोणते शुल्क नाही. सीसीटीव्ही, रस्त्यावरील चेंबर दुरूस्त करू. काही मार्गावर पीएमपी बसची संख्या वाढवण्यात येईल. पार्किंगची जागाही वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. फिरत्या हौदात गेल्यावर्षी २६ हजार गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा देखील घरपोच ही व्यवस्था देण्यात येईल.