पुणे : फुगेवाडी ते थेट सिव्हिल कोर्ट हा मेट्रो मार्ग, त्यातील शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या भुयारी मार्गासह सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. सरकारकडून यावर निर्णय होईल, त्यावेळी हा मार्ग त्वरित सुरू करण्याची महामेट्रोची तयारी आहे. महामेट्रो प्रशासनाच्या वतीने सोमवारी ही माहिती देण्यात आली.
शिवाजीनगर भुयारी स्थानकाचे काम पूर्ण झाल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. या वेळी प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, संगणक प्रणालीप्रमुख विनोद अगरवाल, जनसंपर्क विभागाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.
सिव्हिल कोर्ट स्थानकात वनाज ते रामवाडी या उन्नत (इलेव्हेटेड, रस्त्याच्या वरून जाणारी) मार्गावरच्या मेट्रोचे स्थानकही आहे. इंटर चेंजिंग स्थानक असल्याने भुयारी मेट्रोतून उन्नत मेट्रोत प्रवाशांना सहज जाता येण्याच्या सुविधा या स्थानकात आहेत. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मेट्रोमधून थेट कोथरुडला जाणे शक्य होणार आहे.
पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर सध्या मेट्रो सुरूच आहे. त्यानंतर, रेंजहिलपर्यंतच्या मार्गावरील दोन स्थानकांचे काम तेथील भूसंपादन उशिरा झाल्यामुळे थोडे शिल्लक आहे. ही दोन्ही स्थानके वगळून मेट्रो थेट सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
दर्शनी भाग गडकिल्ल्यांसारखा
पुणे शहराला असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व या स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक हे नाव या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन महामेट्रोच्या या संपूर्ण स्थानकाचा दर्शनी भाग गडकिल्ल्यांसारखा करण्यात आला आहे. आतील बाजूस पुण्यातील जुने वाडे, तुळशी वृंदावने, खिडक्यांचा खास आकार, मंदिरासमोर असणाऱ्या दीपमाळा अशा खास गोष्टी असतील. इतकेच काय, पुण्यातील मुळा मुठा या नद्यांना असणाऱ्या पूर्वीच्या घाटांचा अभ्यास करून, त्याप्रमाणेच आरेखन करण्यात आले आहे.
मेट्रोच्या प्रवाशाला शिवाजीनगर स्थानकात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतरही आपण जुन्या पुण्यातच फिरतो आहोत, असा आभास होईल अशी रचना स्थानकाची केली आहे.
- डॉ.ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्राे.