पुणे : पुणे महानगर समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. या समितीत ४५ सद्स्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य हे निवडणुकीद्वारे निवडून येण्याची अट देखील शासनाने दिली आहे. या समितीचे शासन नियुक्त सचिव म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त काम पाहणार आहे.
७४ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने ज्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या १० लाखांपेक्षा कमी नसेल त्याकरिता महानगर नियोजन समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यामध्ये एक अध्यक्ष, दोन पदसिद्ध सदस्य, १२ नामनिदेर्शित सदस्य आणि विशेष निमंत्रित यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
---
...अशी असेल समिती
* अध्यक्ष-मुख्यमंत्री
* ३० सदस्य हे निवडणुकीद्वारे नियुक्त होतील (अद्याप रिक्त)
* दोन सदस्य - विधानसभा व विधान परिषद - यात मावळचे आमदार सुनील शेळके आणि पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांचा समावेश आहे.
* शासन निर्देशित पदसिद्ध सदस्य दाने - यामध्ये अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मुंबई, आणि पुणे विभागीय आयुक्त.
* स्थानिक स्वराज्य संस्थाचे सहा कार्यकारी अधिकारी - यामध्ये पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड नगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी आणि लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी.
* अनुभवी/तज्ज्ञ चार सदस्य - मुख्य अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे), कार्यकारी संचालक (महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळ), अध्यक्ष-मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज, पुणे) आणि नगर रचना विभागाचे निवृत्त सहसंचालक भ. व. कोल्हटकर.
* विशेष निमंत्रित सदस्य (संसद व विधानसभा क्षेत्र) - सुप्रिया सुळे (लोकसभा सदस्य), संजय राऊत (राज्यसभा सदस्य), श्रीरंग बारणे (लोकसभा सदस्य), तानाजी सावंत (विधानसभा सदस्य), संग्राम थोपटे (विधानसभा सदस्य).
* राज्य शासनाच्या उपक्रमांचे सहा मुख्य कार्यकारी अधिकारी- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्याैगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा पुणे मुख्य प्रशासक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक.
* केंद्र शासनाच्या आस्थापनांचे प्रतिनिधी - पुणे मध्य रेल्वे विभागीय अधीक्षक, पुणे दूरसंचार निगम प्रतिनिधी, सिव्हिल एव्हिएशन/एअरपोर्ट पुणे प्रतिनिधी.
* राज्य शासनाचे नगर रचना संचालनालय पुणे संचालक.
* शासन नियुक्त सचिव-पीएमआरडीए आयुक्त.