लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रोच्या दोन खांबांमधील मोकळ्या जागांचे सुशोभिकरण करण्याबाबत महामेट्रोने महापालिकेला प्रस्ताव दिला आहे. या जागांचा जाहिरातीसाठी व्यावसायिक वापर शक्य असल्याचे त्यात नमूद करण्यात आले असल्याचे समजते.
मेट्रोच्या दोन खांबांमध्ये दुभाजकासारखी साधारण १० फुटांपेक्षा मोठी जागा आहे. ३१ किलोमीटरच्या संपूर्ण मेट्रो मार्गावर (भुयारी मार्ग वगळता) अशी सलग जागा आहे. दोन्ही बाजूंनी सध्या ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तिथून वाहनावर किंवा चालतही रस्ता ओलांडता येत नाही. या जागेसंबधी महामेट्रो कंपनीने महापालिकेला प्रस्ताव दिल्याचे समजते. या जागेचा गैरवापर टाळण्यासाठी महामेट्रोने ही जागा व्यावसायिक स्तरावर वापरात आणण्यासाठी महापालिकेला कळवले आहे.
या जागी ‘फ्लॉवर बेड’ किंवा तत्सम सजावट शक्य होईल. त्याच्याकडेच देखभाल, दुरूस्तीचे काम दिल्यास त्यासाठी वेगळा खर्चही करावा लागणार नाही. वनाज ते गरवारे महाविद्यालय याप्रमाणे सलग काही भागही वापरात आणणे शक्य आहे. महामेट्रो व महापालिका संयुक्तपणे हे काम करू शकते, असे या प्रस्तावात नमूद केल्याचे समजते.