पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी आता मेट्रोकडून खास एक तास अधिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीपासून मेट्रो रात्री १० ऐवजी ११ वाजेपर्यंत धावणार आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.मेट्रोला लोकांचा वाढता वापर आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या दोन्ही मर्गिकांवरील पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६ ते रात्री 10 अशी आहे. तर आता 26 जानेवारी 2025 पासून या सेवेमध्ये एक तासाची वाढ करून ही प्रवासी सेवा रात्री 11 पर्यंत वाढवण्यात येत आहे. पुणे मेट्रोची वारंवारता गर्दीच्या वेळी (स. 8 ते 11 आणि संध्या. 4 ते 8) दर 7 मिनिटांनी व कमी गर्दीच्या वेळी (स. 6 ते स. 8, स. 11 ते दु. 4 आणि रा. 8 ते रा.10) दर 10 मिनिटांनी आहे. आता रात्री 10 ते 11 या वाढलेल्या वेळेमध्ये मेट्रोची वारंवारता दर 15 मिनिटांनी असणार आहे.पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये मेट्रो कार्डचा वाढता वापर लक्षात घेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रो 26 जानेवारी 2025 रोजी एक पुणे ट्रान्झिट कार्ड फक्त 20 रुपयांना उपलब्ध करून देत आहे. या दिवशी पहिली 5000 एक पुणे ट्रान्झिट कार्ड 20 रुपयांना मिळणार आहे.या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हणाले की, "सध्या पुणे मेट्रोचा वाढता वापर लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ केली आहे. रात्री कामावरून उशिरा घरी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वेळेवर पोहचणार आणि सुरक्षित असा सार्वजनिक वाहतूक पर्याय यामुळे नागरिकांना उपलब्ध होणार आहे."
प्रजासत्ताकदिनी मेट्रोची पुणेकरांना खास भेट...!
By श्रीकिशन काळे | Updated: January 25, 2025 19:27 IST