पुणे : ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे उदघाटन म्हणजे माझ्या हक्काच्या जागेचे उदघाटन झाले असेच मला वाटते. भौतिक विकासापेक्षाही माणूस घडविण्याचे काम कलाकार, साहित्यिक मंडळी करत असतात. त्यामुळे मेट्रो होण्याइतकाच आर्ट प्लाझा होणेही महत्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले़ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते़ या कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप , हायटेक टेक्सटाईल पार्क(बारामती)च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण, नगरसेविका मीनल सरवदे, उषा कळमकर, मीना परदेशी, माजी आमदार बापूसाहेब पाठारे, हेरिटेज विभागाचे श्याम ढवळे आदि उपस्थित होते. अॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या , ह्य परदेशात नदीकिनारी, ब्रीजवर अनेक कलाकार आपली कला सादर करीत असतात. त्याच धर्तीवर ज्या कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आर्ट प्लाझा असून ‘स्मार्ट सिटी’ पेक्षा ‘हैप्पी सिटी’असण्यासाठी या आर्ट प्लाझा चे महत्व आणि उपयुक्तता अधिक आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वाना या आर्ट प्लाझा मध्ये आनंद घेता येणार आहे. ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’मध्ये रोज सायंकाळी ४ ते ८ या वेळेत संगीत, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)
मेट्रोइतकाच आर्ट प्लाझाही महत्त्वाचा
By admin | Published: December 26, 2016 3:48 AM