पुणे :म्हाडानेपुणे, पिंपरी चिंचवड शहरासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आतापर्यंत २२ हजार ७४० जणांनी नोंदणी केली आहे. त्यातील १२ हजार ७७८ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. नोंदणीसाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवार (दि. २६) असून अनामत रक्कम भरण्यासाठी बुधवारपर्यंत अनामत रक्कम भरण्याची मुदत आहे. तर ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी गुरुवारपर्यंतची (दि. २८) मुदत आहे. याची सोडत सोडत १८ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. म्हाळुंगे येथील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत.
या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. याबाबत ‘म्हाडा’च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील म्हणाले, “या सोडतीमध्ये रहिवासाचा दाखला बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज परिपूर्ण मिळत आहेत. पूर्वीच्या सोडतीत सोडतपूर्व व सोडतनंतर मोठा गोंधळ उडाला होता. आता हा घोळ होणार नाही अशी अपेक्षा आहे. मात्र, राखीव जागांसाठी अर्ज करणाऱ्यांना अन्य कागदपत्रांसाठी थोडी सवलत देण्यात आली आहे. त्यात माजी सैनिक, एस एसटी यांचा समावेश आहे.”
पुणे जिल्ह्यातील पाच हजार ४२५ सदनिका, सोलापूर ६९, सांगली ३२ व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ९ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध होणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हाडाच्या मंडळाच्या पुणे कार्यालयात १८ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.