पुणे :पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) विविध घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठीच्या अर्ज भरण्याची मुदत रविवारी (दि. २६) संपली. यंदा झालेल्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे गेल्या काही सोडतींच्या तुलनेत अर्जांची संख्या घटली आहे. यंदा केवळ ६४ हजार ७८१ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
म्हाडाच्या घरांच्या सोडतीत मानवी हस्तक्षेप किंवा वशिलेबाजी केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, म्हाडाच्या घरांसाठी अर्जप्रक्रिया यंदापासून ऑनलाइन राबविण्यात आली. अर्ज भरण्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण कागदपत्रे भरण्याची अट ठेवली. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच जुना रहिवासाचा दाखला सॉफ्टवेअरद्वारे स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे अनेकांना ते मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून त्यात नवा दाखला काढण्यासाठी लिंक देण्यात आली. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदा सहा हजारांहून अधिक सदनिकांसाठी सोडत होणार असली तरी त्याला केवळ ६४ हजार ७८१ एवढेच अर्ज आले आहेत.
ऑनलाइन प्रक्रियेत अडथळा येत असल्याने सुरुवातीला असलेली ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवावी लागली. त्यानंतर ही मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली. त्यानंतरही केवळ ६४ हजारच अर्ज आले. प्रत्यक्षात एक लाखांहून अधिक जणांनी अर्जासाठी नोंदणी केली आहे. मात्र, एकूण अर्जांपैकी ४० हजार जणांचा रहिवासाचा दाखल्याची खात्री करण्यात आली, तर ६४ हजार ७८१ पैकी ४५ हजार ४६१ जणांनी कालपर्यंत मुदतीत पैसे भरले. यापूर्वी अशा सोडतीला एक लाखांहून अधिक अर्ज येतात. मात्र यावेळी अर्जांचा प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर किती जणांना घर मिळणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.
याबाबत म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने म्हणाले, यंदाच्या सोडतीला ६४ हजार जणांचे अर्ज प्राप्त झाले आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेकांना अडचणी आल्या. पण सर्वांना घरे मिळतील, अशी अपेक्षा आहे.