पुणे : पोलीस उपनिरीक्षक आणि म्हाडाच्या (MHADA Exam) विविध पदांची परीक्षाही याच दिवशी आल्याने हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार होता. म्हाडाच्यापरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यामुळे विद्यार्थ्यंनी केली होती. त्याची दखल घेत म्हाडाने तीन पदांची २९ अन् ३० जोनवारीची परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. आता सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे म्हाडाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) ५६५ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील परीक्षेचे दोन दिवसांपूर्वी सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते. यात सहायक/वरिष्ठ लिपिक/कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांची परीक्षा २९ जानेवारी आणि ३० जानेवारी या दोन दिवशी एकूण सहा सत्रात होणार होती. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रात परीक्षा घेण्यात येणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले हाेते.
उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व म्हाडा प्राधिकरण या दोन्ही परीक्षा देण्यास अडथळा येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेची सुधारित तारीख म्हाडा लवकरच संकेतस्थळावर जाहीर करणार आहे. तर उर्वरित क्लस्टर मधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत.