पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील तीन हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांसाठी अनामत रक्कम भरण्याची मुदत गुरुवारी संपली. नोंदणी केलेल्या सुमारे ४३ हजार ५०० अर्जदारांपैकी ३६ हजार ७६ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. अनामत रक्कम भरलेले अर्जदारच लॉटरीसाठी पात्र असतील, त्याची संगणकीय (आॅनलाईन) सोडत ३० जूनरोजी होणार आहे. सदनिका आणि भूखंड हे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी असून, सोडतीसाठी १९ मे पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली. अर्ज सादर करण्याची मुदत मंगळवारी (दि. १९) संपली. अनामत रक्कम भरण्यासाठी ‘आरटीजीएस’, ‘एनइएफटी आणि आॅनलाइनचे पर्याय देण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अनामत रक्कम भरण्यास एक दिवस मुदतवाढ देण्यात आली होती. म्हाडाच्या पुणे विभागाचे प्रभारी प्रमुख अधिकारी विजय लहाने म्हणाले, म्हाडा लॉटरीसाठी संगणकीय सोडत ३० जून रोजी होणार आहे. तसेच, नांदेड सिटी येथे सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत सुरु होईल. सोडतीसाठी ८४ विविध गट आहेत. त्याची क्रमाने सोडत होईल. सोडतीत क्रमांक लागल्यास संबंधित अर्जदाराने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल.
म्हाडा लॉटरीत ३६ हजार अर्ज पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:05 PM
म्हाडा सदनिका आणि भूखंड हे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी असून, सोडतीसाठी १९ मे पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात
ठळक मुद्देसुमारे ४३ हजार ५०० अर्जदारांपैकी ३६ हजार ७६ जणांनी अनामत रक्कम भरली नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अनामत रक्कम भरण्यास एक दिवस मुदतवाढ