पुणे : म्हाडा परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिला एजंटला बीड येथून अटक केली आहे. परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील ही ११ वी अटक आहे.
कांचन श्रीमंत साळवे (वय ३१, रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) असे या एजंटचे नाव आहे. कांचन साळवे हिला अटक करुन न्यायालयात हजर केले असता तपासासाठी २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणानी विविध १४ संवर्गातील गट अ, ब क मधील रिक्त पदांची भरती परीक्षा १२, १५ व २० डिसेंबर २०२१ रोजी घेण्याचे निश्चित केले होते. या परीक्षा घेण्याचे काम डॉ. प्रितिश देशमुख यांच्याकडे देण्यात आले होते. एजंटमार्फत पैसे घेऊन देशमुख याने इतरांच्या मदतीने परीक्षार्थींना पेपर पुरवित असल्याचे परीक्षेच्या आधीच निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याच्यासहीत दोघा एजंटांना अटक केली होती. त्यानंतर रात्रीतून म्हाडाने ही परीक्षा रद्द केली होती.
कांचन साळवे हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले. साळवे ही यातील आरोपी राजेंद्र सानप यांच्या प्रत्यक्ष संपर्कात होती. तिने स्वत:चे व इतर ६ परीक्षार्थीचे म्हाडा परीक्षेचे हॉल तिकीट सानप याला पाठविले होते. हॉल तिकीट ज्या परीक्षार्थींचे होते त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असून त्यांनी परीक्षेसंदर्भात सेटिंग लावून देण्यासाठी साळवे हिच्याकडे ते पाठविले होते. तसेच त्यांना नोकरी लावून देण्यास असल्याचे या परीक्षार्थींनी पोलिसांना सांगितले आहे.
आरोपींनी पेपरफुटीचा कट कसा रचला. परिक्षेचे वेळी आरोपीकडे असलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने वाढविण्यात येणार होते,याचा सखोल तपास करायचा आहे. या पेपरफुटीच्या कटात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा आहे. आरोपी आणखी किती परीक्षार्थींच्या संपर्कात होते. किती परीक्षार्थींना एकत्र केले होते. आणखी कोणत्या परीक्षांमधील पेपरफुटीत त्यांचा सहभाग आहे का याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले. म्हाडा पेपर फुटीप्रकरणात सायबर पोलिसांनी १० आरोपींवर ९ मार्च रोजी पहिले दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असून पुरवणी दोषारोपपत्र १० मे रोजी दाखल केले आहे.