पुणे :म्हाडापुणे विभागाच्या वतीने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील ३ हजार १२० सदनिकांची ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सामान्यांना हक्काचे घर मिळाल्याने त्यांचा पाडवा गोड झाला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रोजगारासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना मापक व परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देताना किमान सोयी-सुविधांही द्याव्यात. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी. तसेच बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी. अधिकची घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करून तातडीने घरांच्या सोडती काढाव्यात.
पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आला.
यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने उपस्थित होते.
एकूण सदनिका - ६ हजार ०५८,
एकूण प्राप्त अर्ज - ५८ हजार ४६७
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका- २ हजार ९३८
२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे - २ हजार ४८३
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे -६३७
पुणे मंडळामार्फत काढण्यात आलेल्या ६ हजार ५८ सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी सहभाग नोंदविला आहे. यातील २ हजार ९३८ सदनिका या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिल्या. ३ हजार १२० सदनिकांसाठी ५५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले. या सोडतीमध्ये घरे मिळालेल्यांना एसएमएस, ई-मेलद्वारे माहिती दिली आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावरसुद्धा ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- नितीन माने, मुख्याधिकारी, म्हाडा, पुण