इंदापूर : म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असल्याची माहिती भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की, दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना,रिंगचा भाग मुरुम व मातीसह विहिरीत कोसळला. त्यामुळे विहिरीचे काम करणारे सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्षे), जावेद अकबर मुलाणी (वय३० वर्षे), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० वर्षे), मनोज मारूती चव्हाण (वय ४० वर्षे)हे चार कामगार त्या मलब्याखाली गाडले जावून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना घडली त्यावेळी आपण मुंबईत होतो. तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना म्हसोबाचीवाडी दुर्घटनेची माहिती दिली. मृत कामगारांची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीयांना शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमवेत मांडली. तसे पत्र ही दिले. त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.