पुणे : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आले असून, महाराष्ट्र राज्यावर काहीही परिणाम होणार नाही. राज्यात आकाश निरभ्र राहणार असून ५ व ६ डिसेंबर रोजी मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्यकडे सुरू आहे. या वादळामुळे विदर्भ व आग्नेय मराठवाडा वगळता राज्यात आकाश निरभ्र राहणार आहे. मराठवाड्यात पुढील ४८ तास हवामान कोरडे राहणार आहे. मराठवाड्यात ५ व ६ डिसेंबरदरम्यान आग्नेयकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील ४८ तास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४८ तास मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होईल. तसेच सोसाट्याचे वारे वाहील. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. ६ डिसेंबरला भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली येथे पाऊस होईल. ८ तारखेनंतर राज्यात हवामान कोरडे होईल. किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पूर्व किनारपट्टीजवळ वादळी प्रणालीची निर्मिती झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (दि. ५) दुपारपर्यंत हे चक्रीवादळ नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सध्या उत्तर भारतात जम्मू-काश्मीर पर्वतीय क्षेत्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या जमिनीवरच्या (पश्चिमी झंझावात) चक्रीवादळातून हिमवर्षाव होत आहे, तर अडीच हजार किमी अंतरावर दक्षिणेत पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या 'मिचॉन्ग' समुद्री चक्रीवादळातून चेन्नई-सीमांध्र पूर्व किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होत आहे.
महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. शुक्रवार ८ डिसेंबरपासून ह्या ठिकाणीही ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळून हळूहळू थंडीला येथेही सुरुवात होण्याची शक्यता जाणवते.
- माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ