पिंपरी : दररोज पैसे गुंतवून मुदतीनंतर योग्य परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी भाजी मंडईजवळील मायक्रो फायनान्स कंपनीच्या तिघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय साहू, प्रफुल्ल स्वेन, राजकुमार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. मायक्रो फायनान्स कंपनीत ३० डिसेंबर २०११ पासून दररोज शंभर रुपये जमा करणारे चिंचवड येथील सतीश शेरखाने (वय ३५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेरखाने यांनी ३० डिसेंबरपासून १ जानेवारी २०१५ अशा परतावा मुदतीकरिता कंपनीत रोज शंभर रुपये जमा केले. दरम्यान, पैसे घेण्यासाठी शेरखाने यांच्याकडे येणारा कंपनीचा कलेक्शन एजंट अचानक बंद झाला. शेरखाने यांनी चौकशी केली असता, कंपनी बंद झाल्याचा प्रकार उघडकीस आला. कंपनी व आरोपींनी २ लाख ११ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचे शेरखाने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शेरखाने यांच्यासह इतरही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे उघडकीस येत आहे. काही दिवसांपासून कार्यालय बंद झाल्याने हे गुंतवणूकदार हवालदिल आहेत. या गुंतवणूकदारांनी गुरुवारी कंपनीसमोर गर्दी केली होती. शेरखाने यांनी तक्रार दिल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा केला आहे.(प्रतिनिधी)
मायक्रो फायनान्सच्या तिघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: November 24, 2014 12:18 AM